निरवडेतील डुक्कर व्यवसायाचा ग्रामस्थांना त्रास : संजू परब यांना निवेदन

आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार : अधिकाऱ्यांना इशारा

सावंतवाडी | प्रतिनिधी : निरवडे गावात भरवस्तीत सुरू असलेल्या डुक्कर व्यवसायामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या प्रश्नावरून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. व्यवसाय करण्याला कोणाचा विरोध नाही, मात्र इतरांच्या आरोग्याशी खेळू नका असा इशारा देत याप्रकरणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

निरवडे गावातील भरवस्तीत रोशन धारगळकर यांच्याकडून डुक्कर पालनाचा व्यवसाय केला जातो. मात्र, या प्रकल्पामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून स्थानिक नागरिक आरोग्य विभागाकडे सतत तक्रारी करत आहेत, परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

न्याय मिळत नसल्याने त्रस्त ग्रामस्थांनी संजू परब यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी परब यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की,

भर वस्तीत अशा प्रकारे प्रकल्प चालवणे चुकीचे आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तक्रार करूनही ६ महिने अधिकारी झोपले आहेत का असा सवाल करीत जर अधिकारी दखल घेणार नसतील, तर त्यांना पालकमंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

हा विषय तातडीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानावर घातला जाईल आणि त्यांना रीतसर निवेदन दिले जाईल, असेही परब यांनी स्पष्ट केले. यावेळी राजू धुमाळ, विलास नाईक, प्रतीक्षा पारकर, रोहन धुमाळ, वासुदेव गावडे, सर्वेश जाधव, चंद्रशेखर पेडणेकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.