लांजा कुवे बचाव समितीची भूमिका, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर
लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शहर प्रारूप विकास आराखड्याला लांजा कुवे बचाव समितीने तीव्र विरोध केला असून या आराखड्याला तात्काळ स्थगिती मिळावी, अशा मागणीचे निवेदन आज सोमवारी नगरपंचायती चे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांना सादर करण्यात आले.
लांजा नगरपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखडा (डीपी प्लॅनला) अगदी सुरुवातीपासूनच लांजा आणि कुवेतील नागरिकांनी कडाडून विरोध केला होता. नागरिकांना देशोधडीला लावणारा हा प्रारूप विकास आराखडा आम्हाला नकोच किंबहुना तो रद्दच करावा अशी आग्रही मागणी सुरुवातीपासूनच मांडण्यात आलेली आहे.
या पार्श्वभूमीवर लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने आज सोमवारी मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, लांजा शहराच्या प्रारूप विकास योजने मधील फेरबदल सुचीचे महाराष्ट्र
प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २८ (४) अन्वये प्रसिद्ध के केलेल्या जाहिरातीमध्ये अवलोकन केले असता नागरिकांनी प्रारूप विकास आराखड्यावर दाखल केलेल्या १५०० ते १६०० हरकातीपैकी केवळ ४० ते ५० हरकतींचेच फेरबदल करण्यात आलेले आहेत. उर्वरित हरकतींचे निर्णय अद्याप झालेले नाहीत किंवा हरकतदारांना आपल्याकडून हरकती संदर्भात निर्णय कळवण्यात आलेले नाहीत. असे असतानाही संबंधित हरकतदारांचे हरकतीबाबत कोणताही निर्णय घेतला तर त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच करण्यात आलेले फेरबदल हे प्रत्यक्ष जागेवर पाहणी न करताच केलेले असल्याने दिसून येत आहेत.
यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. याची आपण दखल घेतलेली नाही. त्यामुळे लांजा कुवे शहर विकास आराखड्या बाबत नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांच्या समवेत लांजा आणि कुवे ग्रामस्थांची एक संयुक्त बैठक घेण्यात यावी. त्याचप्रमाणे या प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्याला आमचा पूर्णपणे ठाम विरोध असून त्याला स्थगिती मिळावी अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन सादर करताना लांजा कुवे बचाव समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर, तसेच बाबा धावणे, शिवाप्पा उकली, सचिन लिंगायत, इकबाल गिरकर आदींचा अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













