दापोली : खेर्डी संयुक्त वन व्यवस्थापन समितीला जिल्ह्यात प्रथम क्रमांक

दापोली | प्रतिनिधी : संत तुकाराम वनग्राम योजना सन २०२४-२५ अंतर्गत रत्नागिरी (चिपळूण) वन विभागाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत खेडी (ता. दापोली) येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या समितीला शासनातर्फे ५१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
सन २०२३-२४ मध्ये प्राप्त प्रस्तावांच्या आधारे मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये विविध निकषांवर समित्यांचे मूल्यमापन करण्यात आले. वनीकरण, मृद व जलसंधारण, वनसंरक्षण, वनवणवा प्रतिबंध, अतिक्रमण व अवैध चराई रोखणे, वन्यजीवांसाठी पाणवठे उपलब्ध करणे, श्रमदान, लोकसहभाग, महिलांचा सहभाग, पर्यायी इंधनाचा वापर, निधीचा योग्य विनियोग, अभिलेख व्यवस्थापन, नवकल्पना व जनजागृती या सर्व बाबींमध्ये खेडी समितीने उत्कृष्ट कामगिरी केली.
जिल्ह्यात सध्या ८४ गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या कार्यरत असून तालुकास्तरावरून निवड झालेल्या सात समित्यांमधून अंतिम निवड करण्यात आली. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मालदिली (ता. चिपळूण) समितीला मिळाला असून त्यांना ३१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
खेडी समितीचा प्रस्ताव आता कोल्हापूर वनवृत्तामार्फत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. समितीच्या यशामध्ये अध्यक्ष तथा सरपंच सौ. रिया जितेंद्र पवार, उपसरपंच शरद तांबे, सदस्य सचिव वनपाल रामदास खोत, वनरक्षक विश्वंभर झाडे तसेच सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरले.