जलप्रदूषण आणि प्लास्टिक संकटावर आधारित प्रदर्शन ठरले विशेष आकर्षण
दापोली प्रतिनिधी :- २२ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक जलदिनानिमित्त दापोली तालुक्यातील जालगाव येथे निवेदिता प्रतिष्ठानतर्फे जलपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि पाण्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता. हा कार्यक्रम निवेदिता प्रतिष्ठानचे कार्यालय तसेच भारतरत्न पांडुरंग वामन काणे स्मारक येथे पार पडला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. परांजपे यांनी दिली.
या वेळी श्रीक्षेत्र केशवराज येथून आणलेल्या पवित्र जलकलशाचे पूजन ज्येष्ठ सदस्य रमेश जोशी व सौ. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे जलप्रदूषण आणि वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर आधारित प्रदर्शन होय. व्हिडिओ, भित्तीफलक, प्रत्यक्षिके आणि विविध वस्तूंच्या माध्यमातून सध्याच्या पाणीस्थितीचे वास्तव मांडण्यात आले. प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान तसेच मानवी शरीरात होणारा मायक्रो आणि नॅनो प्लास्टिकचा प्रवेश याबाबत धक्कादायक माहिती नागरिकांसमोर ठेवण्यात आली. एका व्यक्तीच्या शरीरात दरवर्षी सुमारे २५० ग्रॅम प्लास्टिक प्रवेश करतो, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली.
याशिवाय प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरता येणाऱ्या वस्तू, कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व आणि प्लास्टिक संकलनाची गरज याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कोकणातील पारंपरिक जीवनशैलीची आठवण करून देणारे ५० ते १५० वर्षे जुने वस्तूंचे दालन देखील नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, जालगाव ग्रामपंचायत सदस्य शोभा दांडेकर, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. निवेदिता प्रतिष्ठानच्या संयोजन समितीने केलेल्या नियोजनबद्ध आणि मेहनतीमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.












