सावंतवाडी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत शहर विकासासाठी २४ ठरावांना मंजुरी

सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्याचा ठराव मंजूर

सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा येथील लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झाली. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासह सार्वजनिक हिताच्या एकूण २४ ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, विणा जाधव, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, निलम नाईक, ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते.

सभेत शहर विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. नळपाणी योजना आणि गॅस पाईपलाईनच्या कामाबाबत नगरसेवक अजय गोंदावळे आणि देवा टेमकर यांनी उपस्थित केलेल्या सूचनांची दखल घेत, ठेकेदाराकडून कामाची गुणवत्ता राखण्याबाबत आणि स्वच्छता करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. या कामांना गती देण्यासाठी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी नळपाणी योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवण्याबाबतचा प्रस्ताव मांडला.

शहरातील नागरिकांच्या सुविधांसाठी नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी स्मशानभूमी परिसरातील दफनभूमी, पाणपोई व वन्यजीवांच्या उपद्रवाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच ॲड. सायली दुभाषी यांनी पाणीटंचाईच्या निवारणासाठी उपाययोजना सुचवल्या. नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी ठेकेदारांच्या कामांसाठी अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करण्यावर भर दिला. यासह सीसीटीव्ही यंत्रणा आणि सार्वजनिक उद्यानांच्या देखभालीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सभेतील एक महत्त्वाचा आणि स्वागतार्ह निर्णय म्हणजे, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नगरपरिषद आस्थापनेवरील सफाई कामगारांच्या वारसांना सफाई कामगार म्हणून नियुक्ती देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे संबंधित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, ॲड. निरवडेकर यांनी या निर्णयाबद्दल संपूर्ण सभागृहाचे अभिनंदन केले.

शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व नगरसेवकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही सभा अत्यंत फलदायी ठरली. प्रशासकीय स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देत सभेची सांगता करण्यात आली.