मसुरे | झुंजार पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुणगे सारख्या ग्रामीण भागात गेली ५५ वर्ष शिक्षण दानाचे कार्य अविरतपणे करणाऱ्या श्री भगवती एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. नरसिंह नारायण पंतवालावलकर यांची
एकमताने निवड करण्यात आली. संस्थेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा “शारदाश्रम विद्यामंदिर, दादर, मुंबई” येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी सदर निवड करण्यात आली. संस्थेचे मानद सचिव श्री. विजय बोरकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून सन २०२१-२२ सालचे आर्थिक हिशेब, हिशेब तपासणीसांचा अहवाल आणि वार्षिक अहवाल उपस्थितांपुढे सादर केला.
सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. शांताराम कृष्णाजी ऊर्फ बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले व गेली अनेक वर्षे मानद सचिव, कार्याध्यक्ष अशा विविध पदांची जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडणारे श्री. नरसिंह नारायण पंतवालावलकर यांची संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.संस्थेचे दोन उपाध्यक्ष श्री. विलास अनंत मुणगेकर आणि श्री. सुरेश गोविंद बांदेकर यांना पुढील तीन वर्षाकरिता उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले. तसेच कार्यकारिणी सदस्य यांची देखील निवड सर्वानुमते करण्यात आली. गावातील सर्व वाडीच्या प्रतिनिधीना कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले.
संस्थेच्या श्री भगवती हायस्कूल इमारतीला ५५ वर्ष झाल्याने इमारत धोकादायक स्थितीत असून त्याच्या दुरुस्तीची तातडीने गरज आहे. याकरिता संस्थेच्यावतीने माजी विद्यार्थी, सभासद आणि हितचिंतकांना आर्थिक सहकार्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देवून या सभेमध्ये अनेक माजी विद्यार्थी, सभासद आणि हितचिंतकांनी सढळ हस्ते देणगी दिल्याने तातडीने ३ लाख ९१ हजार एवढी देणगी सभेच्या ठिकाणी जमा झाली.
सभेला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, माजी विद्यार्थी, मुणगे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. न. ना. पंतवालावलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बहुतांश माजी विद्यार्थी या संस्थेच्या कार्यकारिणीवर प्रतिनिधत्व करीत आहेत हे दुर्मिळ उदाहरण असल्याचे नमूद केले. तसेच सर्वांनी अशाच प्रकारे एकमेकांना साथ देत काम करण्याचे आवाहन केले.
संस्थेचे सहचिटणीस श्री. प्रदीप दिनकर परुळेकर यांनी शालेय इमारतीच्या दुरुस्तीकरिता सर्वांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले. दात्यांनी देणगीचे धनादेश “श्री भगवती एज्युकेशन सोसायटी” या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र खाते नंबर २०१७०८२२३८० – IFSC – MAHB0000710,सारस्वत बँक खाते नंबर ०१०२००१०००४६२८० – IFSC- SRCB0000010 येथे NEFT / RTGS अथवा UPI च्या माध्यमातून थेट रक्कम जमा करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. आभार प्रदीप परुळेकर यांनी मानले.