रत्नागिरी जिल्हा कृषी सल्ला: आंबा-काजू बागायतदारांनी वणव्यापासून सावध राहण्याचे आवाहन

 पुढील पाच दिवस हवामान कोरडे

रत्नागिरी: २४ मार्च २०२६ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा (२५ ते २९ मार्च) कृषी हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

हवामान अंदाज: उष्णतेत वाढ होणार

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. या काळात कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान, तर किमान तापमान २१ ते २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः २५ ते २७ मार्च दरम्यान कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी २.७ ते ४.१ किमी राहील.

आंबा आणि काजू पिकासाठी महत्त्वाचा सल्ला
  • वणव्यापासून संरक्षण: वाढत्या उष्णतेमुळे जंगलात वणवा लागून आंबा-काजू बागांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे बागांमध्ये ठराविक अंतराने वणवा निरोधक पट्टे काढावेत.

  • आंबा काढणी: हापूस आंब्याची काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतरच करावी. काढणीसाठी ‘नूतन’ झेल्याचा वापर करावा, जेणेकरून फळांना इजा होणार नाही आणि ‘साका’ होण्याचे प्रमाण कमी राहील.

  • फळांचे जतन: फळकुजव्या रोगापासून बचावासाठी काढणीनंतर फळे ५२ अंश सेल्सिअस गरम पाण्यात १० मिनिटे बुडवून ठेवावीत. तसेच, फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेत प्रति एकर २ या प्रमाणात फळमाशी रक्षक सापळे लावावेत.

  • पाणी व्यवस्थापन: फळधारणा झालेल्या झाडांना शक्य असल्यास १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. मात्र, काढणीपूर्वी एक महिना पाणी बंद करावे.

    भाजीपाला आणि इतर पिके
  • मूग व भेंडी: या पिकांवरील मावा आणि तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. प्रादुर्भाव जास्त असल्यास डायमेथोएट किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीनची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.

  • नारळ व सुपारी: नवीन लागवड केलेल्या रोपांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांनी सावली करावी. पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडाला ठिबकद्वारे दररोज ४० लिटर पाणी द्यावे.

पशुधन आणि कुक्कुटपालन
  • पशुपालन: जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी त्यांना दुपारच्या तीव्र उन्हात चरण्यास नेऊ नका. पिण्याच्या पाण्यात १% गूळ आणि ०.५% मीठ मिसळून द्यावे.

  • कुक्कुटपालन: पक्ष्यांच्या शेडवर गवत किंवा भाताचा पेंढा टाकून तापमान कमी ठेवावे आणि त्यांना पुरेसे थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.

अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.