डीबीजे ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबीराचे आयोजन

नशामुक्त व क्षयरोगमुक्त युवा घडविण्याचा संकल्प!

चिपळूण (वार्ताहर) : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) +2 स्तरांतर्गत ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे आयोजन शनिवार दि. २८ नोव्हेंबर ते दि. ४ डिसेंबर या कालावधीत जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, दातेवाडी, खेडी, ता. चिपळूण येथे करण्यात आले आहे. यावर्षीच्या शिबिराचे ब्रीदवाक्य ‘नशामुक्त व क्षयरोगमुक्त युवा’ असे असून युवकांमध्ये व्यसनमुक्ती, क्षयरोग प्रतिबंध, आरोग्य जागृती, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामविकासाची भावना निर्माण करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.
शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ माधव बापट यांच्या उपस्थितीत शिबिराचा उद्घाटन समारंभ होणार आहे. या शिबिरात योगेश बंडागळे यांचे ‘पत्रकारिता : काल, आज आणि उद्या’ या विषयावर, प्रा. विनायक बांद्रे यांची सूत्रसंचालन कार्यशाळा, प्रा. अमित शेवडे यांचे ‘सायबर फ्रॉड अवेअरनेस’ या विषयावर , ॲड. नयना पवार यांचे कायदेविषयक मार्गदर्शन होणार आहे.तसेच पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुने या ‘विद्यार्थ्यांचे योग्य वर्तन व POCSO कायदा’ या विषययावर, एस. डी. कोळी यांचे क्षयरोग जनजागृती,सुहास वाघमोडे यांचे ‘Decoding the Language of Animals’ या विषयावर, प्रा. अरुण जाधव यांचे ‘जलसंवर्धन : आजची बचत, उद्याची सुरक्षितता’ या विषयावर, डॉ. डी. टी. कदम हे ‘राष्ट्रीय सेवा योजनेतील युवकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त सकाळी ८ वाजता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या शिबिराच्या निमित्ताने विविध आरोग्यविषयक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिर, तर ३० नोव्हेंबर रोजी नेत्रतपासणी शिबिर आणि लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय शिबिराच्या कालावधीत पथनाट्य सादरीकरण, श्रमदान, बौद्धिक कार्यक्रम, पहाटेचा परिपाठ, महिला सक्षमीकरणविषयक उपक्रम तसेच ग्रामस्वच्छता आणि जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता समाजातील प्रश्न समजून घेऊन सामाजिक परिवर्तनाचे सक्रिय दूत बनावे, आरोग्यदायी व व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि ग्रामीण विकासात योगदान द्यावे, हा या निवासी शिबिरामागील मुख्य हेतू आहे. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अविनाश पालशेतकर यांनी दिली.