खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरवणे गावची ग्रामदैवत असलेली पुरातनकाळीन आदिशक्ती श्री रामवरदायिनी देवीची वार्षिक यात्रा यंदा चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. या यात्रेनिमित्त संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
यात्रोत्सवाच्या दिवशी सकाळी ८ वाजता मंदिरात स्थापित देवदेवतांची महापूजा होणार असून सकाळी ९ ते १० या वेळेत पारंपरिक पद्धतीने लाटेची पूजा व लाट पाडण्याचा विधी पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत लाटेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १२.३० ते २ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ ते ६ या वेळेत लाट बगाडावर चढविण्याचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ६ ते ७ या वेळेत देवीची महाआरती मोठ्या भक्तिभावाने केली जाणार आहे. रात्री ८ ते ९.३० या वेळेत पुन्हा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत निमंत्रित पालख्यांचे आगमन, स्वागत आणि पालखी भेटीचा सोहळा पार पडणार आहे.
रात्री १०.३० ते १२ या वेळेत निमंत्रित पालख्यांसह श्री रामवरदायिनी मातेचा छबिना अर्थात पालखी प्रदक्षिणा मोठ्या जल्लोषात निघणार आहे. यानंतर रात्री १२ वाजता आराध्य प्राप्ती प्रस्तुत शाहीर रत्नाकर महाकाल यांचा लोकनाट्य तमाशा सादर होणार असून यात्रेचा मुख्य आकर्षण ठरणार आहे.
हा दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी सहकुटुंब, मित्रमंडळींसह उपस्थित राहावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चोरवणे ग्रामस्थ, श्री रामवरदायिनी देवस्थान कमिटी तसेच ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई व पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.













