लांजा येथील उद्योजक विकास शेट्ये यांनी मानले आभार
लांजा (प्रतिनिधी): देशात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डीझेलच्या किमती नियंत्रणात ठेवणे ही अत्यंत गरजेची बाब होती. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा ठरला असुन याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे लांजा येथील उद्योजक विकास शेट्ये यांनी आभार मानले आहेत.
याबाबत बोलताना उद्योजक विकास शेट्ये म्हणाले की,
पेट्रोल-डीझेलचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होतो आणि परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडते. उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे इंधनाचे दर काही प्रमाणात स्थिर राहण्यास मदत झाली आहे, ज्याचा फायदा शेतकरी, कामगार, व्यापारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना झाला आहे.
सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा हा प्रयत्न देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशा निर्णयांमुळे जनतेमध्ये सरकारबद्दल विश्वास निर्माण होतो.
आजच्या कठीण आर्थिक परिस्थितीत जनतेच्या हिताचा विचार करून घेतलेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. भविष्यातही अशाच जनहिताच्या निर्णयांची अपेक्षा देशवासीयांना असल्याचे विकास शेट्ये यांनी म्हटले आहे.












