थकबाकीदारांवर सावंतवाडी नगरपरिषदेची जप्तीची कारवाई

६ मालमत्ता केल्या सील

सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी नगरपरिषदेच्या कर विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध कडक मोहीम हाती घेतली असून, शहरातील ६ मालमत्तांना सील ठोकण्यात आले आहे. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून ३१ मार्चपर्यंत ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सावंतवाडी शहरात निवासी, बिगर निवासी, मिश्र व औद्योगिक अशा एकूण ११,९५७ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. वारंवार आवाहन करूनही कर भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांवर ही कारवाई केली जात आहे. १ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत ज्या मालमत्ताधारकांचा कर थकीत आहे, त्यांच्यावर ३१ मार्चपर्यंत जप्तीची कारवाई सुरू राहणार आहे.

नागरिकांना यापूर्वीच मागणी बिले वाटप करण्यात आल्यामुळे आता कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या मोहिमेत कर व प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, गोविंद गवंडे, कर निरीक्षक प्राची पाटील, लेखापाल प्रसाद बटवाल, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत आणि नगररचनाकार गौरव बुगड यांच्या पथकाचा समावेश आहे. मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी न भरणाऱ्यांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई देखील पाणीपुरवठा विभागाने सुरू केली आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही नगरपरिषदेचे नागरी सुविधा केंद्र कर भरणा करण्यासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. जप्तीची किंवा नळतोडणीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने आपली थकबाकी जमा करावी, असे आवाहन मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केले आहे.