वर्दे येथे संपन्न होणार लकी ड्रॉ व नवनविन उपक्रमांचा भव्य उद्घाटन सोहळा

स्वप्निल कदम: कुडाळ :  वर्दे येथील ग्रामपंचायतीतर्फे ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान’ अंतर्गत लकी ड्रॉ तसेच विविध नवनविन उपक्रमांच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ग्रामपंचायत वर्दे येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, प्रमोद कामत (अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग), रवींद्र खेबुडकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग), तुकाराम साईल (उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग), यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच जयप्रकाश परब, सिताराम तेली, मिलिंद नाईक यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक उपक्रमांचे उद्घाटन, नागरिकांसाठी आकर्षक लकी ड्रॉ योजना तसेच गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या योजनांची माहिती या कार्यक्रमातून दिली जाणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत वर्देच्या वतीने करण्यात आले असून ग्रामपंचायत अधिकारी स्वप्ना मसगे व सरपंच महादेव पालव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.