पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली २० नोव्हेंबरला सिंधुदुर्गनगरीत ‘जल संवाद’
जलसंधारणासाठी समाजाला एकत्र आणण्याचा संकल्प!
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे! आज वाचवलेला पाण्याचा थेंब उद्याच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करू शकतो. राज्यभर पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना भूगर्भातील खालावत चाललेली पाण्याची पातळी आणि हवामान बदलाचे वाढते आव्हान ही संपूर्ण समाजासाठी चिंतेची बाब बनली आहे. अशा परिस्थितीत केवळ शासनाच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. याच विचारातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ यशस्वी झाली. आता या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देत पाण्याच्या प्रश्नावर समाजमन जागृत करण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी येथे ‘जल संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधु आत्मनिर्भर अभियान आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या अभियानाचे प्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि प्रसाद देवधर यांनी या उपक्रमाची पत्रकार परिषदेत सोमवारी माहिती दिली.
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची मोहीम राबविण्यात आली. प्रशासन, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, महिला बचतगट, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसहभागातून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमातून एक महत्त्वाचा संदेश समोर आला, तो म्हणजे पाण्याचा प्रश्न केवळ सरकारचा नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या भविष्याचा आहे.‘जल संवाद’च्या माध्यमातून जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे नियोजन, लोकसहभाग आणि शाश्वत जलव्यवस्थापन यावर विचारमंथन होणार आहे. वनराई बंधाऱ्यांच्या चळवळीने निर्माण झालेली लोकजागृती आता गावागावांत जलसंवर्धनाची कायमस्वरूपी चळवळ बनावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
पाण्याचे संकट हे केवळ उन्हाळ्यात जाणवणारे संकट नसून त्याचे सर्व सजीव सृष्टीवर परिणाम करणारे हे संकट आहे. या संकटात समाजाने एकत्र येऊन त्यावर मात करण्याची गरज आहे. पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत जिरवणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. सिंधुदुर्गसारख्या निसर्गसमृद्ध जिल्ह्यातही भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी आतापासूनच सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. या जनजागृतीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या जलसंवाद कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अभ्यासक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माधवराव भांडारी हे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती आहे. शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार भावना मध्ये हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अतुल काळसेकर यांनी केले आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब जपला, तरच उद्याची तहान भागेल. त्यामुळे जलसंवर्धन ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता प्रत्येक गावाची, प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनावी, या व्यापक भूमिकेतून हा ‘जल संवाद’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.













