जैतापूर आठवडा बाजारात सरपंचांनी लावली शिस्त

ग्रामस्थ, ग्राहक व व्यापाऱ्यांकडून स्वागत

जैतापूर वार्ताहर: जैतापूर येथील आठवडा बाजारातील वाढती अव्यवस्था दूर करण्यासाठी सरपंच राजप्रसाद राऊत यांनी स्वतः बाजारात उपस्थित राहून पाहणी करत काहीशा बेशिस्त आठवडा झालेल्या बाजाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी सकाळपासूनच बाजार परिसरात फिरून त्यांनी दुकानांच्या मांडणीची पाहणी केली तसेच वाहन चालक व ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत काही बेशिस्त व्यापाऱ्यांना समज दिली.
सरपंच राऊत यांनी अशा प्रकारे आठवडा बाजाराला शिस्त लावल्याने ग्रामस्थ, ग्राहक व व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जैतापूर आठवडा बाजारासाठी ग्रामपंचायतीकडून दुकानदारांना पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली असतानाही काही व्यापारी रस्त्यालगत दुकाने लावत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे ग्राहक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन सरपंच राजप्रसाद राऊत यांनी संबंधित व्यापाऱ्यांना शिस्त पाळण्याच्या सूचना दिल्या.
जैतापूर आठवडा बाजाराचे योग्य नियोजन व्हावे अशी मागणी होत होती. याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. याची दखल घेत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या साहाय्याने परिसराची साफसफाई करून दुकानदारांसाठी लाईन आऊट करण्यात आली होती. त्यानंतर काही आठवडे शिस्त राखली गेली; मात्र पुन्हा काही व्यापाऱ्यांकडून बेशिस्तपणा सुरू झाल्याचे निदर्शनास आले, जैतापूरचे ग्रामदैवत श्रीदेवी वेताळ पालखी मार्गावरही काही व्यापाऱ्यांनी दुकाने लावल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
याची दखल घेत आता सरपंचांनी स्वतः बाजारात उपस्थित राहून दुकानदारांना समजावून सांगत ग्राहक व वाहनचालकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न केले. बाजार अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित व्हावा यासाठी सर्व व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.