राजापूर (वार्ताहर): वेगवेगळया विषयांच्या व विविध कथा व आत्मचित्र यांसारख्या वाचनाची आवड जोपासणाऱ्या येथील राजापूर नगर वाचनालयाचे ज्येष्ठ वाचक सभासद आणि राजापूरचे माजी नगराध्यक्ष रमाकांत मालपेकर यांचा नुकताच जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे हस्ते उत्तम वाचक म्हणून गौरव करण्यात आला.
वाचन संस्कृती टिकवून ठेण्यासाठी आणि पुस्तकांकडे वाचकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने रत्नागिरी येथे दोन दिवशीय रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री. मालपेकर यांचा उत्तम वाचक म्हणून गौरव करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक एड. विलास कुवळेकर, बालसाहित्यिक मदन हजेरी, ग्रंथालय संचालक महेश सोनजे, शिक्षणाधिकारी मेंगाने, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक, ग्रंथालय निरिक्षक हेमंत काळोखे आदी उपस्थित होते.
समाजवादी विचारसरणीचे पाईक असलेले माजी नगराध्यक्ष रमाकांत मालपेकर हे उत्तम वाचक असून राजापूर नगर वाचनालयाचे ते ज्येष्ठ सभासद आहेत. अनेक वर्षे ते वाचनालयाचे सभासद असून उत्तम वाचक आहेत. त्यांनी आजवर अनेक पुस्तके वाचली आहेत. वयाची सत्तरी उलटली तरी आजही ते नित्यनेमाने नगर वाचनालयात पुस्तके बदलण्यासाठी येत असतात.
अलिकडच्या काळात तरूण पिढी वाचनापासून दूर होत असताना अगदी शालेय वयातच जडलेला वाचनाचा छंद श्री. मालपेकर जोपासताना पाहायला मिळत आहेत.













