चिपळूण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिले निवेदन
चिपळूण (वार्ताहर) : सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवरती एका व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ, बदनामी, धमकी व समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल केल्याने चिपळूण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण यांच्याकडे या पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी निवेदन दिले आहे.
वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियावर घडलेली घटना लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
दिनांक २६ मार्च रोजी Instagram या सोशल मीडियावर/वेबसाईटवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीने अत्यंत अपमानास्पद, जातीवाचक आणि समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली आहेत.
त्या व्यक्तीने खालीलप्रमाणे गंभीर स्वरूपाचे अपराध केले आहेत . त्यामध्ये जातीवाचक वक्तव्ये अवमानकारक व द्वेषपूर्ण भाषा वापरून समाजाची बदनामी केली आहे.
जाणीवपूर्वक समाजातील व्यक्तीचा अपमान करून त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या जातीमध्ये वैर, द्वेष व असंतोष पसरवण्याचा त्या व्यक्तीने प्रयत्न केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महान व्यक्तीविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यामुळे सामाजिक वातावरण गढूळ होत आहे. याची दखल घेत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी चिपळूण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देताना अध्यक्ष संदीप गमरे, महासचिव संदेश कदम, प्रमुख संघटक सुधाकर पवार, सुभाष जाधव, सुशांत जाधव, विनोद कदम, धर्मपाल पवार, मनोहर मोहिते, अनिल पवार, राजेंद्र सावंत, श्रीधर सकपाळ, संतोष कदम आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.











