महिलेच्या हत्येप्रकरणी संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी

हत्येप्रकरणी वापरण्यात आलेला कोयता पोलिसांनी केला जप्त

सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे ६५ वर्षीय महिलेची निर्घुण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित बापलेकाला आज सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक ४ एप्रिल पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी या हत्याप्रकरणातील कोयता जप्त केला असून संशयिताने संबंधित महिलेकडील कोयता घेऊनच हे कृत्य केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
रविवार २९ मार्च रोजी सायंकाळी ओवळीये मधलीवाडी येथील सरस्वती धोंडी सावंत या महिलेची निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते. याप्रकरणी संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी लागलीच ताब्यात घेत त्यांच्यावर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, या घटनेच्या तपासात पोलिसांना काही बाबी उघड झाल्या आहेत. सदर प्रकार हा जमिनीच्या वादातून असल्याचे पुढे आले असले तरीही प्रत्यक्ष हत्येच्या वेळी वेगळाच वाद निर्माण झाल्याचे तपासात लक्षात आले आहे. सरस्वती सावंत व त्यांचा मुलगा एकनाथ सावंत हे दोघे आपल्या शेतीलगत असलेल्या परिसरात सरपणासाठी लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते. याच वेळी संशयित विजय सावंत व त्याचा मुलगा रघुनाथ सावंत हे त्या ठिकाणी येऊन लाकडे तोडतानाचे छायाचित्रण आपल्या मोबाईलवर करू लागले. याबाबत संबंधित महिला व तिचा मुलगा एकनाथ याने याबाबत त्यांना जाब विचारत छायाचित्रण करण्यास मज्जाव केला. यावेळी झालेल्या वादाचे पुनर्वसन मारहाणीत झाले.

यावेळी एकनाथ याने विजय सावंत यांच्या हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मुलगा रघुनाथ याने धावत येऊन त्याला उलट जाब विचारला. आपल्या वडिलांशी हुज्जत घालत असल्याचे पाहून त्याने सरस्वती सावंत यांच्या हातातील कोयता हिसकावून घेत पाठीमागून त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार केला. हा वार एवढा गंभीर होता की त्या रक्तबंबाळ होत जागीच खाली कोसळल्या.

रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आपल्या आईला पाहून एकनाथ याने आरडाओरडा केला. यावेळी दोन्ही संशयित घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याने आपल्या आईला उपचारार्थ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

यानंतर या घटनेची फिर्याद मुलगा एकनाथ याने सावंतवाडी पोलिसात दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी जात पंचनामा करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा दोघांविरोधात हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर त्वरित सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भेट देत घटनेची माहिती घेतली.

त्यानंतर सोमवारी दोघांनाही येथील न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी पोलिसांनी पुन्हा एकदा संशयितांसह घटनास्थळी जाऊन तपास केला. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरण्यात आलेला कोयता जप्त केला.
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार या दोन्ही कुटुंबामध्ये जमिनीवरून गेली अनेक वर्षे किरकोळ वाद होते. अलीकडेच संशयित विजय सावंत याने सरस्वती यांच्या जमिनीत कोंबड्यांची पोल्ट्री उभारण्यासाठी जांभे दगड टाकले होते. याबाबतचा तक्रार अर्ज सरस्वती यांनी आंबोली दुरक्षेत्राच्या पोलीस ठाण्यात शनिवारी दाखल केली होता. त्यानंतर पोलिसांनी गावात जाऊन याप्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्या दोघांनाही सोमवारी आंबोली पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले होते मात्र तत्पूर्वीच सरस्वती यांची निर्घुण हत्या झाली. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.