चंदुलाल शेठ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कोलाज चित्रांचे आकर्षक प्रदर्शन

खेड (प्रतिनिधी) : श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलच्या प्रशालेच्या मैदानावर ‘शैक्षणिक कट्टा’ या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मुद्रा व कोलाज चित्रांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. निसर्गाच्या सानिध्यात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक संजय बुटाला यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विजय मस्के, पर्यवेक्षक यु. जी. कांबळे, ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड, कलाशिक्षक राकेश देवरुखकर, नगरसेविका सौ. हेमा आंबुर्ले (खेडेकर) यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कापडाचे रंगीत तुकडे, कागद तसेच विविध टाकाऊ वस्तूंचा वापर करून सृजनशीलतेने आकर्षक कोलाज चित्रांची निर्मिती केली. निसर्गातील विविध रंगछटा आणि कल्पनाशक्ती यांचा सुंदर संगम या कलाकृतींमधून पाहायला मिळत होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांची सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन खुले वातावरणात आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनादरम्यान उत्कृष्ट कलाकृती सादर करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हे चित्रप्रदर्शन विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले असून, काही निवडक कलाकृती विक्रीसाठीही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यासोबतच त्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.