दागिने चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीना जामीन मंजूर

ॲड. उल्हास कुळकर्णी, ॲड. प्राची कुळकर्णी, ॲड. अमेय कुळकर्णी यांनी पाहीले काम

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयावरुन दाखल गुन्ह्याचे तपासाकरीता अटक संशयीत अमृता अमर म्हापणकर (रा. कुंभारमाठ ता. मालवण) व राघो सूर्यकांत राऊत (रा. सुकळवाड ता. मालवण) यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी जामीन मंजुर केला आहे. याकामी संशयित आरोपी तर्फे ॲड. उल्हास कुळकर्णी, ॲड. प्राची कुळकर्णी, ॲड. अमेय कुळकर्णी यांनी काम पाहीले.

१७ जानेवारी रोजी मालवण येथील समर्थ कृपा संकुलातील फिर्यादी महिलेच्या राहत्या घरातील मंगळसुत्रासहित सोन्याचे दागिने कपाटातून नाहीसे झाल्याबद्दल संशयीतांविरूद्ध फिर्यादीने मालवण पोलीस ठाण्यात दागिने चोरल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय्य संहिता कलम 305 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याकामी मालवण पोलिसांचा तपास सुरु असताना संशयीत अमृता अमर म्हापणकर राह. कुंभारमाठ ता. मालवण व राघो सूर्यकांत राऊत राह. सुकळवाड ता. मालवण यांना अटक करण्यात आली होते. संशयित आरोपींची पोलीस कोठडीची मुदत वाढवुन मिळण्याची मागणी ३० मार्च रोजी पोलीसांकडुन करण्यात आली. मे न्यायालयाने पोलीसांची वाढीव पोलीस कोठडीची मागणी फेटाळुन लावली व आरोपी यांची प्रत्येकी १५०००/- रकमेच्या जामीनावर मुक्तता केली आहे.