महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे लांजा तालुकावासिय हैराण

लांजा | संतोष कोत्रे : वातावरणातील तापमानाचा पारा चढला असतानाच गेल्या काही दिवसांपासून लांजा शहरासह तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. सततच्या बत्ती गुल होण्यामुळे घामाच्या धारांनी नागरिक मात्र हैराण होत आहेत.तर नागरिकांच्या शासकीय कामांचा खोळंबा होत असून नळपाणी योजनेच्या पाणी पुरवठ्यावरही मोठा परिणाम होत आहे. वीज बील भरले नाही तर कारवाईचा बडगा उगारणारे महावितरण वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी कार्यतत्परता दाखवणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मार्च महिन्यातील उष्म्याचा पारा प्रचंड वाढला असून नागरिक हैराण होत आहेत.‌ दिवसें दिवस वाढणारा उकाडा जीव नकोसा करून सोडत आहे.‌ अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विजपुरवठा खंडित होत असल्‍याने नागरिक त्रस्‍त झाले आहेत. लांजा शहरासह ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. दिवसा बरोबरच रात्री अपरात्री कधीही बत्ती गुल होण्याचे प्रकार वाढले आहेत.‌तालुक्यात खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, गोठवलेले खाद्यपदार्थांचे विक्रेते यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय इतर व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत.
खंडीत वीजपुरवठ्याचा फटका बँका, दवाखाना, प्रशासनाची सुविधा केंद्रे व सेतू सेवा केंद्राला बसत असतो. नेटवर्क सेवा बंद असल्यास सरकारी कामे रखडतात. कागदपत्रे, दाखले घेण्यासाठी आलेले नागरिक व विद्यार्थ्यांना खोळंबून रहावे लागते. तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना दिवसभर ताटकळत रहावे लागते. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड होऊन ल़कांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय.
याबरोबरच सतत खंडीत वीजपुरवठ्यामुळे लांजातील हॉटेल व्यवसायिक पुरते हैराण झाले आहेत. हॉटेल व्यवसायात फ्रिज, डीप फ्रीजर, कोल्ड स्टोरेज यावरच अन्नाची सुरक्षितता अवलंबून असते. परंतु वीजपुरवठा सतत खंडीत होत असल्याने दूध, मांस, भाज्या, आईस्क्रीम यांसारख्या वस्तू खराब होत असून परिणामी ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होताना दिसत आहे.
सततच्या खंडित विजेमुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. लांजा नगर पंचायती मार्फत लांजा शहर व परिसरात तसेच तालुक्यातील गावागावात ग्रामपंचायतीमार्फत नळपाणी योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र खंडीत वीज पुरवठ्यामुळे लोकांना वेळेत पाणी पुरवठा करणे अशक्य बनले आहे. तर
अनेक इमारती, फार्महाऊस, दुमजली घरांमध्ये मोटारीने पाणी चढवले जाते. मात्र विज नसल्‍याने पाणी पोहोचता येत नसल्‍याने नागरिकांची गैरसोय होते. उष्मा वाढत असल्यामुळे शीतपेय व आईस्क्रीमची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र वारंवार विजपुरवठा खंडित होत असल्‍याने आइस्क्रीमसह दुग्‍धजन्य व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. शीतपेयही खराब होत आहेत. सध्या उन्हाळी बेगमीची लगबग सुरू आहे. पिठाची गिरणी, मसाला गिरण्या, इस्‍त्री व लॉन्ड्री व्यावसायिकांनाही फटका बसतो आहे.
याशिवाय शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने फ्रीज, टिव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, पंखा अशा विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड होत असून याचा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागतोय, यामुळे महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात लोकांतून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अशाप्रकारे एकीकडे मार्च अखेर असल्याने वीजबिल भरणा न केल्यास महावितरणकडून तातडीने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. मात्र कमी दाबाने होणारा वीजपुरवठा तसेच सातत्याने खंडित होणारा वीजपुवठा आणि त्यातच असह्य उन्हामुळे उकाडा, यामुळे ग्राहक मेटाकुटीस आले असतानाही महावितरणकडून वीजपुरवठ्याबाबात ठोस कार्यवाही केली जात नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ‌
बडगा उगारणारे महावितरण अधिकारी सेवा देताना तेवढी तत्परता दाखवणार का? असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.