खेड (प्रतिनिधी): तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, खोंडे-भडगाव रस्ता सुधारणा व डांबरीकरणाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विशेष पाठपुराव्यातून या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
या रस्ते विकासकामांसाठी दोन वेगवेगळ्या योजनांतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे: १. अर्थसंकल्पीय योजना (५०५४): सन २०२४-२०२५ अंतर्गत खोंडे-भडगाव रस्ता सुधारणेसाठी २० लाख रुपयांची तरतूद. २. जिल्हा वार्षिक योजना (३०३४): सन २०२५-२०२६ अंतर्गत भडगाव रस्ता डांबरीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य श्री. अरुण उर्फ अण्णा कदम आणि जामगे पंचायत समिती गणाचे सदस्य श्री. संग्राम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी खेड नगरपरिषदेचे गटनेते श्री. निकेतन पाटणे, नगराध्यक्षा सौ. माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष श्री. सतीश उर्फ पप्पू चिकणे यांच्यासह उद्योजक शैलेश कदम, सुनील रेवाळे, ओंकार उसरे उपस्थित होते. तसेच विभाग प्रमुख सुधीर कदम, कुलदीप पवार, अनिल नक्षे, भडगाव-खोंडे सरपंच दीपक पदुमले आणि माजी सरपंच प्रमोद बैकर यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.
खोंडे-भडगाव या मार्गाची प्रदीर्घ काळापासूनची सुधारणेची मागणी आता मार्गी लागली आहे. या डांबरीकरणामुळे परिसरातील वाहतूक सुरक्षित आणि सुलभ होईल, ज्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.













