मिशन जीवन अंतर्गत तालुक्यातील २३० ज्येष्ठ नागरिकांचा राजापूर पोलीसांकडून सन्मान
राजापूर प्रतिनिधी : सर्वसामान्य जनता, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना कायद्याचे आवश्यक ते मार्गदर्शन करून जनतेसाठी असलेल्या या कायद्यांचा अधिक प्रसार करणे ही आपली सगळयांची जबाबदारी आहे. यासाठी राष्ट्रीय विधी प्राधिकरण, जिल्हा प्राधिकरण व या यंत्रणेशी संलग्न असलेल्या यंत्रणा या काम करत असतात. त्यांचे मार्गदर्शन घेऊन समाजातील वंचितांना व कायद्याची व सरक्षणांची गरज असलेल्यांना न्याय देण्याचे काम आपण सगळयांनी केले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचे न्यायाधिश राजेंद्र पाटील यांनी येथे केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या सुचनेवरून राजापूर पोलीसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. ओणी येथील गजानन मंगळ कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन मेळाव्या प्रसंगी व्यासपीठावर उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, दिपज्योती पाटील, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मोमीन शेख आदी उपस्थित होते.
याप्रसंगी न्या. पाटील यांनी महिला, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले, एस. सी. एस. टी समाज तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांना तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर कशा प्रकारे प्राधिकरणाच्या वतीने मोफत वकिल उपलब्ध करून दिला जातो, तर तुरुंगातील कैद्यांना, यामध्ये कच्चे कैदी यांनाही मोफत वकील दिले जातात याबाबत माहिती दिली.
तर विधी प्राधिकरणाच्य वतीने लोक न्यायालयांच्या माध्यमातुन विविध प्रकारचे खटले हे तडजोडीने सोडवलेले जातात.
तर जेष्ठ नागरिकांसाठीही विविध योजना असून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे हक्क व अधिकाराबाबत जागरूक असले पाहिजे असे सांगितले. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे दायीत्व त्यांचे पाल्य नाकारत असतील तर त्या विरोधात प्रांताधिकारी यांच्याकडे न्याय मागता येतो व न्याय दिला जातो याबाबतही न्या. पाटील यांनी माहिती दिली. प्रांताधिकारी त्यांच्या मुलांना आईवडिलांचे पालन पोषण करण्याचे आदेश देऊ शकतात, आणि त्यांनी तसे केले नाही तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाईही केली जाते असेही न्या. पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या मिशन जीवन बद्दल न्या. पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
खड्डयांमुळे अपघात झाल्यास, जनावरांचे हल्ले, पिकांचे नुकसान याबाबतही कशा प्रकारे नुकसान भरपाई मिळविता येते याचेही न्या. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनीही मार्गदर्शन केले. तर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे राजापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने अत्यंत सुयोग्य असे नियोजन करण्यात आले होते.
मिशन जीवन अंतर्गत तालुक्यातील २३० ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
राजापूर पोलीसांच्या वतीने या मेळाव्यात मिशन जीवन अंतर्गत तालुक्यातील २३० ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस केक कापून सामुहिक रित्या साजया करण्यात आला. याप्रसंगी न्या. पाटील यांसह उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित केले. याप्रसंगी पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील मोठया संख्येने उपस्थित होते.













