कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा लांजाचा सभासद स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

लांजा (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा लांजा व लांजा पंचायत समिती, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सभासद स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला.
कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर कोमसाप जिल्हा अध्यक्ष आनंद शेलार, जेष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, कोमसाप शाखा लांजाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण, शिक्षक नेते विनायक हातखंबकर, विजय बेर्डे, श्री. मापारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र जाधव यांनी केले. त्यानंतर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या कथाकथन, वक्तृत्व आणि काव्यलेखन स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. माया तिरमारे, नेहा पाटोळे, अमोल जाधव, मृगया मोरे, तनुजा सरदेसाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचबरोबर स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी परीक्षक म्हणून योगदान दिलेल्या डॉ. राजीव कांबळे, प्रदिप कदम, भीमराव खोत, कुमार गावडे, दिलीप चव्हाण, सविता पाटील, मृगया मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
विजेत्यांमधून अथर्व पाध्ये, सोनाली कदम तर विशेष सन्मान करण्यात आलेल्या तनुजा सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. सन्मान सोहळ्यानंतर प्रमुख वक्ते राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी “अभिजात मराठी भाषा” या विषयावर मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली. अध्यक्षीय मनोगतात आनंद शेलार यांनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा यशस्वीपणे राबवत असलेल्या उपक्रमाबाबत कौतुक केले. ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीला चालना देण्यासाठी परिषद सातत्याने कार्यरत असल्याचे सांगत त्यांनी नवोदित लेखकांनी पुढे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश हरचेकर, रिया लिंगायत आणि बाळू नागरगोजे यांनी केले, तर आभार डॉ. माया तिरमारे यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.