किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने ‘प्रेरणोत्सव’
मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात उभारलेला किल्ले सिंधुदुर्ग गुरुवार २ एप्रिल रोजी ३५९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. किल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, मालवण यांच्या वतीने प्रेरणोत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
भारतीय आरमाराचे जनक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मालवण समुद्रामध्ये उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला हा तमाम भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. गेल्या ३५० वर्षांहून अधिक काळ सागराच्या लाटांशी झुंज देत मोठ्या गौरवाने सिंधुदुर्ग उभा आहे. नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को संस्थेने या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद करुन गौरविले आहे. गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी सिंधुदुर्ग किल्ला ३५९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती गेली १५ वर्षे सिंधुदुर्ग किल्ल्याचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात ‘प्रेरणोत्सव’ म्हणून साजरा करते, प्रतीवर्षी प्रमाणे गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी किल्ल्याचा ३५९ वर्धापन दिन संपन्न होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर या उपस्थित राहणार असून सकाळी ८ वा. मोरयाचा धोंडा येथे श्री. मोरेश्वर पूजन होणार आहे. त्यानंतर १० वा. किल्ले सिंधुदुर्ग श्री. शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन, ११.३० मर्दानी खेळांची सलामी होणार आहे. अशी माहिती किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, मालवण यांच्या वतीने देण्यात आली आहे.
फोटो :













