चिपळूण (प्रतिनिधी) : संस्कृती व परंपरेचे प्रतीक असलेली, भक्तिभावाने व आनंदाने साजरी होणारी चिपळूण तालुक्यातील कळवंडे माडवाडी येथे श्री सुकाई देवी नवलाई देवीची त्रैवार्षिक यात्रा व समा दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. या निमित्ताने तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून प्रमुख आकर्षण असलेली व अत्यंत मानाची समजली जाणारी लाटेची भव्य मिरवणूक पांडुरंग भुवड पाचाड यांच्या घरापासून ते सुकाई देवी सभागृह कळवंडे माडवाडीपर्यंत वाद्यांच्या गजरात वाजतगाजत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या निमित्ताने शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी कळवंडे माडवाडी प्रीमियर क्रिकेट स्पर्धा, रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळपासून लाट तोडणे, पूजा पाठ, दुपारी लाटेची भव्य मिरवणूक सायंकाळी विविध पूजा व स्वागत समारंभ तसेच रात्री नवतरुण नमन नाट्य मंडळ निवळी चौथाई येथील सदाबहार नमन कार्यक्रम संपन्न होणार आहे.तसेच सोमवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता लाट चढवणे कार्यक्रम व दुपारी अडीच वाजता देव देवतांचे आगमन होणार असून यामध्ये श्रीदेवी वाघजाई (कोंढे) श्रीदेवी वाघजाई खेम लखोबा नवलाई ग्रामदैवत (पोसरे) श्रीदेवी वरदान ग्रामदेवता (रामपूर चव्हाणवाडी) श्रीदेवी कालाश्री काळकाई ग्रामदेवता( कात्रोळी लायकवाडी) श्रीदेवी कालाश्री काळकाई ग्रामदेवता (कात्रोळी देऊळवाडी) श्रीदेवी लिंगुबाई भैरी ग्रामदेवता (पाथर्डी) अशाप्रकारे वरील देवतांचा भेटवणेचा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता व लाट फिरवण्याचा कार्यक्रम पाच वाजता संपन्न होणार आहे. तरी तालुक्यातील, पंचक्रोशीतील, कळवंडे गावातील सर्व भाविक, मान्यवर,माहेरवाशीण ग्रामस्थ अबाल वृद्ध यांनी उपस्थित राहून या त्रैवार्षिक समा यात्रा सोहळ्याचा भक्ती भावाने आनंद घ्यावा. असे आवाहन श्री सुखाई देवी विकास मंडळ अध्यक्ष व ग्रामस्थ कळवंडे माडवाडी व श्री सुकाई देवी विकास मंडळ मुंबई मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य व युवक मंडळाने केले आहे.












