दापोली बाजारपेठेत भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान – भाजपा नेते वैभव खेडेकर यांची घटनास्थळी भेट

दापोली (विशेष प्रतिनिधी) – दापोली शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत शनिवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. हॉटेल सन्मान समोरील बिपिन कॉर्नर परिसरात लागलेल्या या आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. या आगीत मोबाईल शॉपी, ज्वेलरी दुकानांसह एकूण तीन दुकाने जळून खाक झाली असून अन्य दोन दुकानांना देखील या आगीची झळ बसल्याचे समोर येत आहे. यामुळे दापोली शहरातील व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही.

या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी बाधित व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि शासनाकडून शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, राकेश माली, सर्वेश पवार यांसह स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.