कोकणात उन्हाळ्यात पावसाची रिमझिम…!

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.

सुरूवातीला शेतकऱ्याला वाटलेले गेल्या पाच-दहा वर्षात झालेलं नुकसान यावर्षी निश्चितपणे भरून निघेल परंतु तसं घडलं नाही. शेतकऱ्यांनी आडाखे बांधत असतानाच त्याच्या मनातील आनंदाचा बंगला कधीचाच मोडून पडला. परंतु तरी देखिल हार न मानता कोकणातील बागायतदार शेतकरी काय तरी हाती लागेल अशा अपेक्षेने आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागेत जाणं त्यांने सोडलं नाही. डोक्यात राग घेऊन बागेतील झाडावर जेसीबी फिरवला नाही. कोकणातील शेतकऱ्यावर जेव्हा-जेव्हा संकट येतात तेव्हा-तेव्हा तो शेतकरी त्याच तडफेने संघर्ष करत उभा रहातो. हा आजवरचा कोकणातील शेतकऱ्याचा इतिहास आहे.हवामानाच्या बाबतीत एवढी अस्थिरता यापूर्वी कधी कोणी अनुभवली नव्हती. चार दिवसांपूर्वी कोकणातील अनेक भागात गावांतून गारांचा पाऊस पडला. कोकणात गारांचा पाऊस ही फार दुर्मिळ बाब परंतु अलिकडे गारांचा पाऊस हा ‘कॉमन’ झाला आहे.

 

कोकणात यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस कोसळत होता. पाऊस पडत असल्याने थंडीचा हंगामही लांबला. कोकणात पिकणारी आंबा, काजू, कोकम, सुपारी, नारळ, फणस ही सर्व फळ ऋतुचक्र नीटपणाने चालत राहिले तर त्या-त्या हंगामात चांगल पिक येत. हवामानाच्या बदलाचा परिणाम आंबा, काजू वर किती मोठ्या प्रमाणावर झाला आहे हे आपण पहात आहोत. कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी सहकारी सोसायटी किंवा बँकाचे कर्ज घेत नाही. तो आंबा बागायतीसाठी नवी मुंबईतील फळबाजारातील मोठ-मोठ्या आंबा दलालांकडून आगाऊ रक्कम उचल म्हणून घेणाऱ्या आंबा बागायतदारांची संख्या मोठी आहे. आंबा बागायतदार आंबा दलालांकडुन आगाऊ रक्कम घेतात व आंब्याचा हंगाम सुरू झाला की आंबा दलाल आगाऊ घेतलेली रक्कम आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या एकूण रक्कमेतून वजा केली जाते. मुंबई फळबाजारातील आंबा दलाल आंबा बागायतदारांना जी आगाऊ रक्कम देतात त्यावर काही ठराविक व्याज लावलं जातं. गेली अनेक वर्षे या पद्धतीने हा आंबा बागायतदार शेतकरी आणि फळबाजारातील आंबा दलाल यांच्यातील हा आर्थिक व्यवहार आहे. नवी मुंबईच्या फळबाजारात जाणाऱ्या आंब्याचा दर आजही आंबा दलाल रूमालाखालीच ठरवत असतात. आंबा दलाल जो दर ठरवेल त्या दराच पत्र (ज्याला पट्टी) म्हणतात. ती पट्टी किती रूपयाची काढायची हे दलालावर अवलंबून असते. मुंबईतील बाजारातील बाजार भावावर ही पट्टी (काढलेला दर) सर्वसाधारणपणे ठरलेला असतो. यावर्षी ज्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दलालांकडुन आगाऊ रक्कम घेतली आहे ते बागायतदार शेतकरी कमालीचे अडचणीत सापडले आहेत. एकतर यावर्षी आंबा पिक दहा-पंधरा टक्के इतकेच आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्याने बागायतीवर केलेला खर्च, काढलेल कर्ज या अशा आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. आंबा दलालांनी आंबा बागायतदार शेतकऱ्यांना जरी घेतलेल्या आगाऊ रक्कमेवरील व्याज दरात सवलत दिली असली तरी घेतलेल्या पैशांची परतपेढ करणे अवघड बनले आहे. कोकणातील सर्वसामान्य शेतकरी कधी फसवणुक करण्याच्या मानसिकतेत नसतो. घेतलेल्या पैशांची परतपेढ केलीच पाहिजे ही त्याची मानसिकता आणि वृत्ती असते. या वर्षीच्या सतत होणाऱ्या वातावरणातील बदलाने बागायतदार शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन गेला आहे. सुरूवातीला शेतकऱ्याला वाटलेले गेल्या पाच-दहा वर्षात झालेलं नुकसान यावर्षी निश्चितपणे भरून निघेल परंतु तसं घडलं नाही. शेतकऱ्यांनी आडाखे बांधत असतानाच त्याच्या मनातील आनंदाचा बंगला कधीचाच मोडून पडला. परंतु तरी देखिल हार न मानता कोकणातील बागायतदार शेतकरी डोक्याला हात लावून न बसता काम करत राहिला. काय तरी हाती लागेल अशा अपेक्षेने त्यांने त्याच्या आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागेत जाणं त्यांने सोडलं नाही. किंवा डोक्यात राग घेऊन बागेतील झाडावर जेसीबी फिरवला नाही. कोकणातील शेतकऱ्यावर जेव्हा-जेव्हा संकट येतात तेव्हा-तेव्हा तो शेतकरी त्याच तडफेने संघर्ष करत उभा रहातो. हा आजवरचा कोकणातील शेतकऱ्याचा इतिहास आहे. यावर्षी कोकणातील बागायतदार शेतकरी, मच्छिमार सातत्याने हवामान बदलाने निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करतच आहेत. हवामानाच्या बाबतीत एवढी अस्थिरता यापूर्वी कधी कोणी अनुभवली नव्हती. चार दिवसांपूर्वी कोकणातील अनेक भागात गावांतून गारांचा पाऊस पडला. कोकणात गारांचा पाऊस ही फार दुर्मिळ बाब परंतु अलिकडे गारांचा पाऊस हा ‘कॉमन’ झाला आहे. अवकाळी पाऊस होतच असतो. यामुळे शेतकऱ्याला जे थोडफार मिळणार आहे ते देखिल हातच निघून जात. बरं कोकणातच आंबा, काजू, कोकम प्रत्येक गावो-गावी वेगळे अनुभव आहेत काही ठिकाणी पिक आलेच नाही तर काही भागात काही शेतकऱ्यांना दामदुप्पट फायदा होईल हे ७ नंबर काजू बी च्या बाबतीत घडल्या. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्याच्या बाबतीत मात्र सर्वत्रच १५ जे २० टक्के इतकेच आंबा झाला आहे. शासनाने कोकणातील आंबा, काजू बागायतदारांसाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये वारंवार नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. कोकणातील आंबा, काजू बागायतदार यावेळी पुर्णपणे उद्धवस्त झाला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्याला मदत देताना इतरवेळचे निकष लागू करण्यात येऊ नयेत. वेगळे निकष लावले पाहिजेत. तुटपुंजी मदत न देता दामदुप्पट मदत देण्यात यायला हवी. तरच कोकणातील शेतकरी या अस्मानी संकटातून सावरू शकेल. काजूच्या बाबतीत तर काही भागात काजू चे उशिराचे पिक थोडेफार चांगले येण्याची शक्यता होती. परंतु मध्येच मागील चार दिवसात चार-सहा वेळा पाऊस पडला. एकिकडे एप्रिल महिना सुरू झाल्याने कोकणात बऱ्यापैकी वातावरण उष्ण आहे. कडक उन्हाळ्याच वातावरण असताना उन्हाळ्यात पावसाचा शिडकावा सुरू आहे. यामुळे वातावरण अधिकच उष्ण बनले आहे. या वातावरणाने नेमका काजू, आंब्याला कोणता फायदा होणार की नोटा हेचमुळी शेतकऱ्यांना ठरवणं कठीण झालं आहे. बदलत्या वातावरणाच्या परिणामात काही किटकांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर उपाय म्हणून किटकनाशकांचा वापर केला जात आहे. मात्र, या किटक नाशकांचा कोणताच प्रभाव न जाणवल्याने उलट किटकनाशकांवर दामदुप्पट खर्च झाला आहे. तो झालेला खर्चही बागायतदार शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नातूनही उलट तोटाच सहन करावा लागण्याची शक्यताच अधिक आहे. पूर्वी कोकणातील मालवणी मुलखात शेतकरी म्हणायचे ‘उन आणि पाऊस कोल्याचा लगीन’ आता हे सार गंमतीने म्हणण्या एवढाही आनंद कोकणातील शेतकऱ्याकडे उरलेला नाही. कोकणात प्रखर उन्हाच्या होरपळीने आणि पावसाच्या शिडकाव्याने जरी वातावरण काहीस आव्हाददायक बनवल तरी कोकणातील शेतकरी मात्र आता पुढे करायच काय याच चिंतेत आहे.