४ थी आणि इ. ७ च्या शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिकांचा अनावरण सोहळा संपन्न

लांजा (प्रतिनिधी) :इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिकांचा अनावरण सोहळा आज सोमवारी सकाळी लांजा पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या हस्ते संपन्न झाला
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा लांजा आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा लांजा त्याच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्यामार्फत तालुक्यातील सर्व इ. ४ थी आणि इ. ७ च्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेतली जाणार आहे. या सराव प्रश्नपत्रिकांचा अनावरण सोहळा सभापती मानसी आंबेकर आणि उपसभापती आदेश आंबोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती लांजा येथे संपन्न झाला. यावेळी जि.प. सदस्या सौ. लिला घडशी व पंचायत समिती सदस्य सौ रसिका मेस्त्री, शैलेश खामकर उपस्थित होते.*
अनावरणानंतर या सर्व सराव प्रश्नपत्रिका गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग व विस्ताराधिकारी चंद्रकांत पावसकर यांच्याकडे तालुक्यातील सर्व परिक्षा केंद्रावर वितरित करण्यासाठी सुपुर्त करण्यात आल्या. ही सराव परीक्षा इयत्ता चौथीच्या ६५० आणि इयत्ता सातवीच्या ५५० विद्यार्थ्यांची तालुक्यातील प्रत्येक केंद्र शाळेत घेण्यात येणार आहे.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघ शाखा लांजा आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा लांजा चे तालुका व जिल्हा पदाधिकारी, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते