खेड ( प्रतिनिधी ) :
दिनांक 22 ते दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी गणपती सणानिमित्त रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या वाणिज्य विभागातील इ. 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी ’मार्केट डे’ या उपक्रमांतर्गत खेड शहर परिसरामध्ये तसेच दि. 22 ते 24 ऑगस्ट रोजी रोटरी स्कूलमध्ये विविध वस्तूंची विक्री करून मनमुराद आनंद लुटला.
सदरच्या सर्व विक्रीकेेंद्रांचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष रो. उपेंद्र तलाठी, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी रो. पराग चिखले, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रो. जोगेश साडविलकर, रोटरी क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष रो. मंदार संसारे, रोटरी क्लब ऑफ खेडचे खजिनदार रो. सुयोग बेडेकर, रो. शेखर तलाठी, रो. अभय तलाठी, रो. संतोष पाटणे, रो. राजेंद्र बारटक्के, रो. विश्वास सोमण, रो. निरंजन दळी, रो. संकेत बुटाला, रो. आदित्य गांधी, रो. संदिप नायकवडी, रो. अमित लढ्ढा, रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आला.
वाणिज्य शाखेच्या इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव येण्यासाठी कॉमर्स डिपार्टमेंट आयोजित गणपती सणानिमित्त विक्री केंद्र चालविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी खास गणेशोत्सवानिमित्त खेड शहरातील न्यू अशोक सायकल मार्ट – बाजारपेठ, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्मार्ट बाजाराच्या समोर बगाराम शेठ यांचे दुकानी, पोलीस स्टेशन समोर आणि वेलनेस मेडिकल शेजारी स्वतः विक्रीकेंद्रे चालवली. तसेच वाहनाच्या माध्यमातून फिरते विक्रीकेंद्रही चालवले. यामध्ये गणेशोत्सवासाठी लागणारे सजावटीचे व पूजेचे साहित्य, अगरबत्ती, धूप, कापूर, नारळ, गणपती मखर, वस्त्र, प्रसाद, रांगोळी, कंठी, हार यांसारख्या विविध साहित्याची योग्य व माफक दरात विक्री करण्यात आली. तरी यातून होणारा नफा सामाजिक कामासाठी वापरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या या विक्रीकेंद्राला खेड परिसरातील भाविकांनीही भेटी देऊन वस्तूंची खरेदी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर ’मार्केट डे’ या उपक्रमातून शाळेतील वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी वस्तू विक्री, नफा – तोटा, पैशांचे व्यवहार व नियोजन, मार्केटिंग कौशल्य, कामाचे व्यवस्थापन व महत्वाचे म्हणजे पैसे कमविण्यासाठी आवश्यक असणारी कष्टाची जाणीव समजून घेतली.
या ’मार्केट डे’ उपक्रमाचे नियोजन रोटरी स्कूलच्या वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापकांनी केले.
संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी कॉमर्स डिपार्टमेंटच्या ’मार्केट डे’ या अनोख्या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.













