सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद कामत यांची पतंजली योग समिती, सिंधुदुर्गच्या जिल्हा समितीने नुकतीच सदिच्छा भेट घेतली. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षीय दालनात ही भेट पार पडली. यावेळी कामत यांचा पतंजली परिवारातर्फे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या भेटीदरम्यान पतंजली योग समितीच्या वतीने जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योगप्रचार आणि प्रसाराच्या कार्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. योगाचा हा वारसा घराघरात पोहोचवण्यासाठी पतंजली समिती जिल्हाभरात जे कार्य करत आहे, त्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही अध्यक्ष प्रमोद कामत यांनी यावेळी दिली.
सहयोग शिक्षण प्रशिक्षणाचे कौतुक
जिल्ह्यात सध्या पतंजली योग समितीच्या वतीने ‘सहयोग शिक्षण प्रशिक्षण’ वर्ग मोठ्या उत्साहात सुरू आहेत. या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतल्यानंतर कामत यांनी या प्रशिक्षणाला शुभेच्छा दिल्या आणि जिल्हावासीयांच्या आरोग्यासाठी असे उपक्रम स्तुत्य असल्याचे नमूद केले.
या प्रसंगी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर, जिल्हा महामंत्री विकास ऊर्फ विकी केरकर, जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मण पावसकर, युवा भारत जिल्हा प्रभारी डॉ. प्रशांत परब, भारत स्वाभिमान कुडाळ तहसील प्रभारी योगेश गवंडे आणि पतंजलीचे कार्यकर्ते रवींद्र वालावलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शेवटी, सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्याची ग्वाही दिल्याबद्दल पतंजली योग समितीच्या वतीने प्रमोद कामत यांचे आभार मानण्यात आले.












