खेडमध्ये ‘नारी महोत्सव’चे भव्य आयोजन; दोन दिवस महिलांच्या कला, कर्तृत्वाचा जल्लोष

खेड (प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरणाला चालना देत त्यांच्या अंगभूत कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने खेड तालुका पत्रकार संघ आणि खेड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ एप्रिल रोजी स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहात भव्य ‘नारी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि गरजू महिलांसाठी मदतीचे उपक्रम अशा विविधांगी कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार असून त्यांच्या कार्यातून इतर महिलांना प्रेरणा मिळावी, हा मुख्य उद्देश आहे. यासोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना सक्षम बनवण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
महोत्सवात महिला भजन मंडळांचे भजन, नृत्य, लावणी तसेच विविध लोककला सादरीकरणांना विशेष स्थान देण्यात आले आहे. पारंपरिक लोकसंस्कृती जपणाऱ्या महिला मंडळांकडून लोककलांचा जागर होणार असून नृत्य व लावणी क्षेत्रातील तरुणींनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय गायनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले असून सहभागी महिला कलावंतांना पत्रकार संघाच्या वतीने प्रोत्साहनपर रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नाट्यगृह परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. सुमारे २० स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली असून महिला बचतगट आणि स्थानिक महिलांचा यात उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या स्टॉल्ससाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याने महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे.
या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, जेष्ठ सल्लागार व संयोजन समिती प्रमुख उत्तमकुमार जैन, श्रीकांत चाळके, सदानंद जंगम, सचिव किशोर साळवी, कार्यक्रमप्रमुख अश्विनी वडके, कार्यक्रम समन्वयक अनुज जोशी, अनिल तांबे, सुनील आंब्रे, उपाध्यक्ष इकबाल जमादार, संगम जाधव, सागर पाचरेकर यांच्यासह सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला, तरुणी आणि महिला मंडळांनी अधिक माहितीसाठी महोत्सव समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष राजू चव्हाण यांनी केले आहे.
दरम्यान, या महोत्सवाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना या माध्यमातून आर्थिक आधार मिळणार असून त्यांच्या स्वावलंबनाला नवी दिशा मिळणार आहे. एकूणच, महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान, कलांना व्यासपीठ आणि आर्थिक उन्नतीचा संगम साधणारा ‘नारी महोत्सव’ खेडमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणार असल्याचे दिसून येत आहे.