बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली माहिती
रत्नागिरी :
राज्याच्या सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 31 मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकेला ढोबळ नफा 93 कोटी 89 लाख तर निव्वळ नफा 32 कोटी 9 लाख झाला असून. एकूण व्यवसाय 5855 कोटी 39 लाखांवर पोहोचला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव, ॲड. दीपक पटवर्धन, रमेश कीर, रमेश दळवी, नेहा माने, राजेंद्र सुर्वे, गजानन पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना डॉ. चोरगे यांनी सांगितले की, बँकेने 0.00 टक्के नक्त एनपीए राखण्यात यश मिळवून आपली आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 1957 मध्ये स्थापन झालेल्या या बँकेने अनेक चढ-उतार पाहिले, मात्र गेल्या 19 वर्षात डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून बँकेचे रूप पालटले आहे. एकेकाळी तोट्यात आणि अडचणीत असलेली ही बँक आज महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारूपाला आली आहे. बँकेच्या सध्या 76 शाखा असून प्रधान कार्यालयासह तालुकास्तरावरील इतर 26 शाखा स्वमालकीच्या जागेमध्ये आहेत. जिल्ह्यात 19 ठिकाणी एटीएम सेंटर सुरु करण्यात आली आहे. डिजिटल बँकिंगमध्येही बँकेने आघाडी घेतली असून जिल्ह्यात 3 मोबाईल एटीएम व्हॅनद्वारे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवली आहे. सहकारी संस्थांना सन 23-24मध्ये बँकेने 30 टक्के लाभांश दिला होता. सहकारी संस्था 30 टक्क लाभांश देणारी देशातील ही एकमेव जिल्हा बँक ठरली होती. केवळ नफा न कमावता सामाजिक बांधिलकी जपत बँकेने प्राथमिक शाळांना 100 संगणक संच, 30 शाळांना सोलर युनिट आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त, जळीतग्रस्त, मुलींचे आश्रम, विविध क्रीडा स्पर्धा, कृषी व पशु प्रदर्शन,शेतकरी मेळावे, शाळांना आवश्यक वस्तू यासाठी मदतीचा हात दिला आहे.
सलग 18 वर्षे नफ्यात राहून बँकेने ऑडिट वर्ग अ कायम राखला असून, ग्राहकांचा विश्वास हेच आमच्या यशाचे गमक असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी यावेळी नमूद केले.
चौकट
बँकेचा आर्थिक लेखाजोखा (31 मार्च 2026 अखेर)
एकूण व्यवसाय : 5855 कोटी 39 लाख
एकूण ठेवी : 3357 कोटी 14 लाख
कर्ज वाटप : 2498 कोटी 25 लाख
गुंतवणूक : 1289 कोटी 28 लाख
निव्वळ नफा : 32 कोटी 01 लाख
नक्त एनपीए : 0.00 टक्के
सीडी रेशो : 74.42 टक्के













