एस.एस.पी.एम. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ‘व्हर्च्यूओसीक २०२६’ तांत्रिक महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

 

कणकवली (प्रतिनिधी):

कणकवली येथील सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये ‘व्हर्च्यूओसीक २०२६’ या भव्य तांत्रिक महोत्सवाचे अत्यंत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. ८ आणि ९ एप्रिल २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवामुळे महाविद्यालयीन परिसर तंत्रज्ञानाच्या चैतन्याने न्हाऊन निघाला आहे.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून

या महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री. भैयाजी उमाबाई गोविंदजी येरमे (सहाय्यक आयुक्त) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग. यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून श्रीमती प्रतिभा चव्हाण (जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सिंधुदुर्ग) आणि श्री. अमीन तडवी (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सिंधुदुर्ग) उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी सर्व पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

तांत्रिक कौशल्यांचा महाकुंभ

या महोत्सवात राष्ट्रीय स्तरावरील पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट एक्झिबिशन, डिबेट, पोस्टर प्रेझेंटेशन, ऑटो एक्सपो, हॅकसप्रिंट, रोबोटिक्स, डिरेक्तो व लॅनगेमिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध स्पर्धांसाठी सुमारे १ लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या तांत्रिक बुद्धिमत्तेला आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे श्री. भैयाजी येरमे यांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक प्रगतीचे कौतुक केले व त्यांनी रोजगार आणि उद्योजकता क्षेत्रातील नवनवीन संधींचा फायदा घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.श्रीमती प्रतिभा चव्हाण यांनी तांत्रिक शिक्षणासोबतच कौशल्य विकासाची जोड असणे किती आवश्यक आहे, यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाचे विद्यार्थी प्रतिनिधी कुमार विष्णू वेजरे, सहसंयोजक प्रा.टी. एस. मालपेकर , संयोजक प्रा. व्ही. व्ही. माईणकर आणि सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कोकणातील विद्यार्थ्यांनी चालू असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी अवगत व्हावे, या उद्देशाने आयोजित या महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक प्रा. व्ही. व्ही. माईणकर यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.