खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन

भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढविण्याचे आवाहन
चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला खरीप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने भात लागवड करण्याचे आवाहन केले आहे. सुधारित भात वाणांचा वापर, योग्य बियाणे प्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी सांगितले.
सध्या तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी भात बियाण्यांची खरेदी पूर्ण केली असून पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू आहे. यंदा पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेच्या अनुषंगाने चिपळूण तालुक्यात विविध शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांना तसेच इतर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत रत्नागिरी-८ आणि कोकण संजय या सुधारित भात वाणांचे प्रात्यक्षिकासाठी मोफत वाटप करण्यात आले आहे. या वाणांच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार भात पिकामध्ये सुरुवातीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे. जैविक किंवा रासायनिक बुरशीनाशकांची शिफारशीनुसार प्रक्रिया करून बियाण्यांचा वापर केल्यास उगवण क्षमता वाढते आणि निरोगी रोपे तयार होण्यास मदत होते. भात उत्पादनासाठी दर्जेदार रोपे तयार होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने शेतकऱ्यांनी गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका तयार करावी. यासाठी साधारण एक ते १.२ मीटर रुंदी, १५ ते २० सेंटीमीटर उंची आणि उपलब्ध जागेनुसार तीन ते दहा मीटर लांबीचे गादीवाफे तयार करून संतुलित खत व्यवस्थापन करावे. रोपवाटिकेत पाणी साचणार नाही याची विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. उत्पादनवाढीसाठी आधुनिक भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चारसुत्री पद्धतीमध्ये योग्य अंतरावर लागवड, भाताच्या तुसाचा वापर, गिरीपुष्पाच्या पाल्याचा वापर आणि युरिया ब्रिकेटचा वापर या चार बाबींवर भर दिला जातो. या पद्धतीमुळे तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि उत्पादनवाढ साध्य होते. तसेच एसआरटी (सगुणा राईस टेक्निक) पद्धतीमध्ये कमी मशागत, सेंद्रिय घटकांचा वापर आणि जमिनीची सुपीकता जपण्यावर भर दिला जातो. या पद्धतीमुळे मजुरी खर्च कमी होतो आणि मातीची उत्पादनक्षमता टिकून राहते. या तंत्रात गादीवाफ्यावर थेट साच्यानुसार बियाणे टोकण्याची पद्धत वापरली जाते. श्री (SRI) पद्धतीमध्ये कमी वयाची रोपे, कमी बियाणे, योग्य अंतरावरील लागवड आणि नियंत्रित पाणी व्यवस्थापन यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते. या पद्धतीमुळे पाण्याची बचत होऊन पीक अधिक जोमदार राहते. खत व्यवस्थापनाबाबतही कृषी विभागाने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. माती परीक्षणानुसार खतांचा वापर करणे, रासायनिक खतांसोबत शेणखत, गांडूळखत आणि जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. नत्र खतांचा अतिरेक टाळून संतुलित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता अबाधित राहते. भात लागवडीपूर्वी जमीन समतल करून योग्य मशागत करणे, पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आणि तण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.
दरम्यान, यंदा एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसात खंड पडणे अथवा अनियमित पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने पेरणी व लागवड करावी. तसेच कमी कालावधीच्या भात वाणांचा विचार करणे, शेतात पाण्याचे साठवण व्यवस्थापन करणे, सेंद्रिय घटकांचा वापर वाढविणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि कृषी विभागाच्या वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी केले आहे.