कोकण विकासाचा ध्यास आणि कोकणी माणसासाठी झटणारे उत्तुंग नेतृत्व !

– मा. नारायणराव राणे वाढदिवस विशेष

माझ्या जवळपास ४० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये विविध पक्षाच्या विविध नेत्यांशी माझा जवळचा संबंध आला. अनेक लोकांशी प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना कधी महाराष्ट्र प्रदेश तर कधी देशाच्या पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. या सगळ्या नेत्यांमध्ये काही नेते आजही माझ्यासाठी आदर्श होते व आहेत. किंवा ज्यांची काम करण्याची पद्धत मला एवढी भावलेली आहे की ज्याचे आपण वर्णन करू शकत नाही. ज्यांना आपण कोकणचे भाग्यविधाते म्हणतो, ज्यांच्या रक्ताच्या  प्रत्येक थेंबात कोकणवासीयांबद्दल आणि कोकणाबद्दल प्रचंड आत्मियता, कोकणच्या विकासाची तळमळ, धडपड आहे असे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे साहेब होय.
नारायण राणे साहेब यांच्यात काम करण्याची धमक आहे,काम करण्याची आत्मियता, तळमळ आहे. हे सर्व पाहिले की त्यांच्या दृष्टीने ते पर्दापण करत असलेले ७५  वय  हे देखील फारसे वाटत नाही. कारण जबरदस्त काम करण्याची क्षमता असलेला माणूस  म्हणून मी नेहमीच त्यांच्याकडे आदराने पाहत आलो आहे. निलेशजींच्या निवडणुकीच्या कालावधीत मी त्यांच्यासोबत अतिशय जवळून काम केले आहे. मंत्रालयात उद्योग खाते सांभाळत असताना राणे साहेबांची कोकणच्या माणसाला मदत करण्याची तळमळ मी पाहिलेली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर कोकणसाठी अतिशय तळमळीने काम करणारा माणूस राणे साहेब यांच्यानंतर दुसरा कोणी असू शकेल. कोकण म्हटलं आणि तिथला माणूस म्हटला की त्याचे प्रश्न सुटलेच पाहिजेत. त्याला  थातूरमातूर उत्तर दिलेले राणे साहेबांना चालत नाही.
याबाबतचा एक किस्सा सांगताना महंमद रखांगी म्हणाले की, मला आठवते की सिंधुदुर्ग येथील एका माणसाला नोकरीसाठी राणीसाहेबांनी इंडियाबुलच्या अधिकाऱ्यांकडे पाठवले होते. तो माणूस परत आला आणि म्हणाला साहेब तिकडे कोणी लक्ष देत नाही. साहेबांनी त्याच क्षणी फोन उचलला आणि इंडियाबुल च्या अधिकाऱ्यांना सांगितले,  तुमच्याकडून जर काम होणार नसेल तर स्पष्ट सांगा की ते काम होणार नाही. मला दुःख वाटणार नाही. पण माझ्या कोकणी माणसाला जर फुकटचे हेलपाटे घालायला लावणार असाल आणि त्याचे काम होणार नसेल तर मला नारायण राणे म्हणतात हे लक्षात ठेवा. अशाप्रकारे दिलेल्या कामाबाबत चुकीचे उत्तर द्यायचे नाही. होणार असेल तर हो आणि होणार नसेल तर ते का अवघड आहे? कशा पद्धतीने सोडवता येईल,  याबाबत मार्गदर्शन करण्याची भूमिका सातत्याने राणेसाहेबांची राहिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आजही मनामध्ये आहे.
आज ते जरी भाजप पक्षात काम करत असले तरी समोरचा माणूस कोणत्या पक्षाचा आहे, त्याची जात कोणती आहे? आणि तो काय काम माझ्याकडे घेऊन आला आहे हे राणेसाहेबांनी आतापर्यंत कधीही पाहिले नाही. याबाबतचा एक किस्सा सांगताना रखांगी यांनी सांगितले की, कोकणातील फुल व्यवसाय अत्यंत डबघाईला आला होता. ज्या मानाने फुलांच्या प्रोडक्शनची कॉस्ट पडत होती त्यामानाने विक्री नव्हती. यासाठी राणेसाहेबांनी एक खास विषय म्हणून मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्गमध्ये लावली होती. त्या बैठकीत कोकणातील फुल व्यवसाय कसा लयाला गेला आहे आणि त्यामुळे येथील शेतकरी कसे अडचणीत आले आहेत, या व्यवसायाची परिस्थिती काय आहे, ते बँकेत कसे कर्जबाजारी झाले आहेत, याबाबतची भूमिका शासनाकडे पटवून देण्याची भूमिका त्यांनी मांडली. या बैठकीमुळे अनेक लोकांचा फायदा झाला. व्याजाच्या माफीमध्ये बऱ्याच जणांना सवलत मिळाली. आमच्या संस्थेचे व्याज पूर्णपणे भरले होते. त्यामुळे आम्हाला काही फायदा झाला नसला तरीपण राणेसाहेबांच्या प्रयत्नामुळे फुल व्यवसायातील कोकणाच्या असंख्य  बांधवांना फायदा झाला. मग  दापोलीपासून ते अगदी सावंतवाडी पर्यंतच्या या सर्व लोकांना व्याजामध्ये सवलत फक्त आणि फक्त राणेसाहेबांमुळेच मिळाली.
निवडणुकीतदेखील काम करताना त्यांच्यासोबत वेगळा अनुभव आला. उगाच खोटी आश्वासने द्यायची नाहीत. मतं मिळवण्यासाठी भूलथापा दिल्या नाहीत. माझ्यासारखा माणूस ज्याने आयुष्यभर शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केलं. आजही आम्ही शरद पवार यांच्यासोबत असलो तरीही कोकणचे नेतृत्व म्हणून आणि कोकणच्या माणसाची नाळ ठावूक असलेल्या आणि कोकणासाठी काम करणारा माणूस म्हणून आम्ही आजही राणे साहेबांकडे आदराने पाहत आहोत. मंत्रालयाच्या केबिनमध्ये बसून सुद्धा सातत्याने कोकणचा ध्यास आणि कोकणी माणसाचा विकास झाला पाहिजे ही त्यांची भूमिका मी जवळून पाहिलेली आहे. एखादा माणूस त्यांच्या संपर्कात आला, त्यांच्या मनामध्ये विश्वास झाला की राणे साहेब त्यांच्या माध्यमातून त्याचे काम करण्यास कधीही मागेपुढे पाहत नाहीत.
एक दोन आयएएस ऑफिसर यामध्ये भूषण गगराणी एकदा त्यांच्या तोंडून स्वतः म्हणाले होते की आजवरच्या मुख्यमंत्र्यांमध्ये अतिशय डॅशिंग, प्रामाणिकपणे आणि समर्थपणे डिसिजन घेणारा मुख्यमंत्री म्हणून राणे साहेबांचे नाव निश्चितच आदराने घेतले जाईल. अशी भूमिका अनेक आयएएस ऑफिसरनी मांडलेली आहे. कारण अंगामध्ये धमक असली, शब्दांमध्ये कणखरपणा असला तरीही हृदयामध्ये माणुसकीचा ओलावा त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांशी वागताना देखील ते कधीही फटकळपणे वागले नाहीत.
लांजा कॉलेजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकदा आम्ही त्यांना मुद्दाम लांजा येथे आणले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील माणसांचे दरडोई उत्पन्न आणि देशातील माणसाचे दरडोई उत्पन्न याचा एवढा आलेख उभा केला. रत्नागिरी जिल्ह्यातील माणसाचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे, विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे, कुठले उद्योग सुरू केले पाहिजेत, याचे अतिशय अभ्यासपूर्ण असे विवेचन केले. यावेळी उपस्थित डॉक्टर, वकील ,इंजिनियर, प्राध्यापक यांनी राणेसाहेबांच्या अभ्यासपूर्ण भाषणाचे कौतुक केले
अशाप्रकारे सगळ्या प्रश्नांची जाण असलेले एक नेतृत्व म्हणून राणेसाहेबांकडे पाहिले जाते. आरोग्य असो, शिक्षण असो, सहकार असो या सगळ्या प्रश्नांची प्रचंड जाण असणारे उत्तुंग नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांना अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त   माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!
– श्री महंमद रखांगी, लांजा.