जयगड परिसरात दुचाकी अपघात; चालकाचा मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना सोमवार 6 एप्रिल रोजी रात्री 11.30 वा.सुमारास आगरनरळ फाटा ते भोईवाडी जाणाऱ्या रस्त्यावरील पाचाडी येथे घडली.
पंकज विश्वास यादव (33,रा.चवे बौध्दवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मृत दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार मिलिंद कदम यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री 11.30 वा.सुमारास पंकज यादव हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-बीजे-1275) वर पाठीमागे प्रथमेश प्रकाश पवार (31,रा.देवूड बौध्दवाडी,रत्नागिरी) याला बसवून खंडाळा ते आगरनरळ मार्गे चवे असा जात होता. तो आगरनरळ पाचाडी याठिकाणी आला असता भरधाव दुचाकीवरील पंकजचा ताबा सूटला आणि दुचाकी रस्त्याच्या विरुध्द दिशेला जाउन गटारात पडली. यात पंकज यादव आणि मागे बसलेला प्रथमेश पवार या दोघांनाही दुखापत झाली. परंतू पंकजला गंभिर दुखापती झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत