खेड (प्रतिनिधी) : दापोली विधानसभा क्षेत्रातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष स. तु. कदम तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय सावंत यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. जमगे येथील निवासस्थानी पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पक्षप्रवेशामुळे खेड-दापोली परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः काही दिवसांपूर्वीच स. तु. कदम यांनी राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघात राबवलेल्या विविध विकासकामांचा प्रभाव वाढत असून, त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजय कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











