चिपळूण (वार्ताहर) : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय साधारण सभा दि. ३, ४ आणि ५ एप्रिल रोजी शांतिकुंज, हरिद्वार (उत्तराखंड) येथे संपन्न झाली. या सभेसाठी देशातील ३६ प्रांतांमधून २७६ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्घाटन सत्रात मुख्य अतिथी म्हणून बोलताना शांतिकुंज, गायत्री परिवाराचे मुख्य व्यवस्थापक योगेंद्र गिरीजी म्हणाले की, “ग्राहक पंचायतीचे कार्य आर्थिक क्षेत्रात आहे, तर गायत्री परिवाराचे कार्य जागतिक स्तरावर आध्यात्मिक क्षेत्रात आहे. ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते निस्वार्थ सेवाभावाने कार्य करत आहेत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.” साधारण सभेमध्ये संघटनेच्या विविध विषयांवरील चिंतनासोबतच, वर्तमान सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर आधारित तीन महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले व ते चर्चा करून मंजूर करण्यात आले. या सभेत मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित करणारा कायदा सरकारने लवकरात लवकर तयार करावा असे सूचित करण्यात आले. शिक्षण क्षेत्र हे शोषणमुक्त, गुणवत्तापूर्ण, स्वस्त आणि सर्वसामान्यांना सहज सुलभ असावे. ऊर्जा संकटाच्या काळात ग्राहक वर्ग सरकारसोबत खंबीरपणे उभा आहे. अनेक मुद्द्यांवर या सभेत चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नारायण शहा, राष्ट्रीय सचिव जयंत कथीरिया, राष्ट्रीय सहसचिव नेहा जोशी, प्रांत अध्यक्ष मानसिंग यादव, प्रांत संघटन मंत्री राजेंद्र बंडगर, प्रांत सहसचिव विकास ढवण प्रांत आदि पदाधिकारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोकण प्रांतमधून उपस्थित होते.













