चिपळूण: प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या चिपळूण एसटी स्थानकावर बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधून सुमारे ७ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कावीळतळी येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी वैष्णवी विश्वनाथ शिंदे (४७) या ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३:२० वाजण्याच्या सुमारास चिपळूण-तिवरे बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये चढण्याच्या घाईत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या चॉकलेटी रंगाच्या पर्समधून शिताफीने हिरव्या रंगाची छोटी पर्स काढून घेतली.
या पर्समध्ये अंदाजे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. चोरीला गेलेल्या मालाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
जास्वंदीच्या फुलाचे डिझाईन असलेले गंथन: ३,१५,००० रुपये (४५.१५० ग्रॅम).
सोन्याचे नेकलेस व पेंडंट: १,१९,००० रुपये (१७ ग्रॅम).
सोन्याच्या बांगड्या: एकूण १,७०,५०० रुपये किमतीच्या दोन बांगड्या.
इतर दागिने: सोन्याच्या चेन, पेंडंट आणि कानातील फुलांच्या आकाराच्या कुड्या.
याप्रकरणी वैष्णवी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. १००/२०२६) दाखल करण्यात आला आहे. ऐन प्रवासाच्या वेळी भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













