तिलारी ( प्रतिनिधी) :दोडामार्ग तालुक्यातील सोनावल येथील एका युवकाचा चंदगड तालुक्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम डेगवेकर रा. सोनावल असे या दुर्दैवी अपघातात प्राणाला मुकलेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वाळकोली फाट्यापुढील धोकादायक वळणावर हा थरारक अपघात घडला.
, शुभम डेगवेकर हे आपल्या दुचाकीने प्रवास करत असताना वाळकोली फाट्याजवळ आल्यावर त्यांच्या दुचाकीची पोल्ट्री (कोंबड्या) वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनाशी जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात गंभीर दुखापत झाल्याने शुभम यांचा जागीच प्राणज्योत मालवली.
अपघाताचा भीषण आवाज होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती चंदगड पोलीस ठाण्याला देण्यात आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. रुग्णालयात आवश्यक ती कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शुभम डेगवेकर यांच्या या अकाली व दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच सोनावल गावासह संपूर्ण तिलारी परिसरावर शोककळा पसरली आहे. एका उमद्या आणि मनमिळाऊ युवकाचा अशा अचानक झालेल्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.











