आंबा घाटातील दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला देवरूख पोलीसांनी ठोकल्या बेड्या

निलेश जाधव / देवरूख : 

आंबा घाटातील दरोड्याप्रकरणी देवरूख पोलीसांनी आत्तापर्यंत ८ आरोपींना गजाआड केल्यानंतर या दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधारालाही बेड्या ठोकण्यात देवरूख पोलीसांना यश आले आहे. शागिद गणी बलबले (रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सुत्रधाराचे नाव आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील प्रथमेश तानाजी दळवी हे दि. ८ एप्रिल रोजी बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील वेतोशी येथून आपल्या बोलेरो गाडीत म्हैस घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. रात्री ८.३० सुमारास आंबा घाटातील दख्खन येथे पांडुरंगा लिहिलेली थार गाडी आणि भारत सरकारचा लोगो लावलेल्या इनोव्हा गाडीतून आलेल्या आठ जणांनी दळवी यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने इनोव्हा गाडीत कोंबले. तेथून त्यांना साखरपा येथील गद्रे पेट्रोल पंपावर नेण्यात आले.

तिथे आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी केली आणि दळवी यांच्या गाडीतील केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ‘जर पोलिसांत तक्रार केली तर याद राख,’ अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले होते. त्यानंतर देवरूख पोलीसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. आता या दरोडा प्रकरणातील मुख्य सुत्रधार शागिद गणी बलबले यालाही पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.