खेड-दापोली मार्गावर लाखोंचा अवैध गुटखा जप्त; इर्टिगा कारसह एक ताब्यात

दापोली (विशेष प्रतिनिधी) – खेड-दापोली मार्गावरील वळणे गावाजवळ हॉटेल घरकुल समोरील परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये गुटखा, सुगंधी तंबाखू आणि इर्टिगा कारचा समावेश आहे.
दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार अर्जुन यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.५५ वाजण्याच्या सुमारास वळणे गावातील हॉटेल घरकुल समोरील ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. आरोपी आनंदा नागप्पा पुजारी (वय ३६, रा. खेंड, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इर्टिगा कार क्रमांक MH-08 BE-8019 या चारचाकी वाहनातून शासन प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता ‘PREMIUM RMD’ कंपनीच्या लेबलचे चार बॉक्स गुटखा सापडले. प्रत्येक बॉक्समध्ये १० छोटे बॉक्स असून एकूण ४० बॉक्समध्ये ९६०० पुड्या होत्या. या गुटख्याची एकूण किंमत १ लाख ४४ हजार रुपये असल्याचे समोर आले. तसेच ‘M Scented Tobacco Gold’ कंपनीच्या लेबलचे सुगंधी तंबाखूचे दोन मोठे बॉक्सही आढळले. त्यामध्ये एकूण ९६ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. याशिवाय आरोपीकडील इर्टिगा कारची किंमत ५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या सर्व मुद्देमालासह आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १२३, २७५, २७४, २२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दापोली मधील इमरान नामक गुटखा व्यावसायिकाकडे हा माल विक्रीसाठी जात होता. पोलिसांनी जरी हा गुटखा पकडून धाडसी कारवाई केली असली तरी देखील दापोली तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे या प्रकरणावरून पुढे आले आहे. त्यामुळे स्थानिक गुटखा व्यवसायिकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांत जोर धरू लागली आहे.