महाराष्ट्र दिनी कोकणाच्या हापूस आंब्याचा गोडवा दिल्लीत

अवघ्या तीन तासांत १००० डझन आंब्यांची विक्री
राजापूर व देवगड जामसांडे येथील हापूसला दिल्लीकरांची पसंती

राजापूर | प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या “कोकण हापूस आंबा महोत्सवात कोकणातील राजापूर व देवगडच्या प्रसिद्ध हापूस आंब्याने दिल्लीकरांची मने जिंकली. कोकणच्या मातीत पिकलेल्या सुगंधी आणि रसाळ हापूस आंब्याला दिल्लीकरांनी मोठी पसंती दर्शवत अवघ्या तीन तासांत तब्बल एक हजार डझन आंब्यांची विक्री झाली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र कृषी विभाग यांच्या वतीने या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादिन जामसंडे चे व्यवस्थापक संतोष पाटकर व राजापूर तालुक्यातील नाणार येथील आंबा उत्पादक शेतकरी उल्हास प्रभुदेसाई ओंकार प्रभुदेसाई या आंबा व्यापाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. या महोत्सवातील कोकणातील शेतकऱ्यांच्या सहभागामुळे कोकणच्या हापूसचा गोडवा थेट देशाच्या राजधानीत पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र सदन येथे सकाळपासूनच आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी या देवगड व राजापूर हापूसची चव घेत त्याचे विशेष कौतुक केले.

देवगडच्या हापूसची एक वेगळी ओळख आहे. तर राजापूरचा हापूस आंबा हा आपल्या अनोख्या चवीमुळे आणि सुगंधामुळे जगभर प्रसिद्ध आहे. याच दर्जेदार आंब्याला दिल्लीकरांनीही मोठी पसंती दिल्याचे या महोत्सवातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. आंबा उत्पादक उल्हास प्रभूदेसाई व ओंकार प्रभुदेसाई यांनी व देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादिन जामसंडे चे व्यवस्थापक संतोष पाटकर आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक होत आहे.

गतवर्षीपासून दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र कृषी विभाग यांच्या वतीने या आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी या आंबा महोत्सवात कोकणातील रत्नागिरी जिल्हयातील राजापुरातील आंबा उत्पादक उल्हास प्रभूदेसाई व ओंकार प्रभुदेसाई व सिंधुदुर्ग देवगड जामसांडे येथील देवगड आंबा उत्पादक संघाचे आंबा बागायतदार सहभागी झाले होते. या “कोकण हापूस आंबा महोत्सवाचा शुभारंभ महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त श्रीमती आर मित्तल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे कोकण विभागाचे कृषी संचालक शिवाजी आमले, दिल्लीच्या अधिकारी श्वेता सिंघल, जीआय तज्ञ प्रशांत यादव, राजापूर तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ आदींसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राजापूर तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे दिल्लीत कोकण हापूसची प्रभावी मांडणी करण्यात यश आले.

या उल्लेखनीय यशाबद्दल राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी ओंकार प्रभुदेसाई आणि कृषी अधिकारी अमोल सकपाळ यांचे विशेष अभिनंदन केले. “राजापूरचा हापूस हा कोकणची ओळख आहे. देशाच्या राजधानीत या आंब्याला मिळालेला प्रतिसाद हा आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे. अशा उपक्रमांमुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल,” असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे कोकणच्या कृषी उत्पादनाची देशपातळीवर मोठी ओळख निर्माण झाली आहे. राजापूरच्या हापूसने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवत दिल्लीकरांची मने जिंकली असून कोकणच्या शेतकऱ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

यावर्षी या आंबा महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पहाता पुढच्या वर्षी यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सामावून घेताना अधिक आंबा विक्री करण्याचे ध्येय कृषी विभागाचे असल्याची माहिती राजापूर तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ यांनी दिली.