श्री नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्यांची नाविन्यपूर्ण संकल्पना
विजयदुर्ग (प्रतिनिधी) : स्थानिक परिसरातील विविध प्रकारची शेती, आंबा व्यवसाय, मच्छीमारी, पर्यटन यातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे मार्गदर्शन म्हणजेच ई मासिक संकल्पना होय असं सुतोवाच सौंदाळे उपसरपंच विष्णू राणे यांनी श्री नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हायस्कूलमध्ये केले. श्री. राणे यांच्या हस्ते ई मॅगेझिनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रानडे, शिक्षक श्री. कदम, श्री. परब, संचालक मंडळ सदस्य जयवंत मिठबावकर, पर्यटन तसेच ई मासिकाचे सल्लागार गुरुनाथ राणे, विजय मिठबावकर, सहदेव राणे आदी मान्यवर उपस्थित होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्यांना सुचल्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी ती प्रत्यक्षात अमलात आणली आणि १ मे रोजी या मासिकाचा पहिला अंक उपलब्ध करण्यात आला.
दरम्यान, कोकणातील सौंदाळे सारख्या ग्रामीण भागात असलेल्या रोजगाराच्या संधी, नवीन तंत्रज्ञान व्यापक स्वरूपात आणून कोकण आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न करण्यासाठी ई मासिक महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या संकल्पनेचे सौंदाळे पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. गावाला नवीन ऊर्जा देण्यासाठी आणि जगासोबत चालण्यासाठी स्थानिक पातळीवर पुढे न आलेले रोजगार भविष्यात गाव संपन्न करणार यात शंका नाही. दरम्यान, या ई मासिकामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील यश, गावातील भौगोलिक ऐतिहासिक महत्त्व असलेले मुलांचे अभ्यासपूर्ण लेख, विकासात्मक आढावा आदींचा सहभाग असणार आहे. ई मासिकाचे सल्लागार तसेच सौंदाळे गावचे सुपुत्र तथा मालवणचे व्यावसायिक गुरुनाथ राणे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, अशा प्रकारच्या संकल्पना शाळेशाळेतून राबविण्यात आल्या तर कोकणात तरुण उद्योजक, व्यावसायिक आणि माहितीपूर्ण राजकारणांची नवीन पिढी उदयास येईल.











