सह्याद्रीच्या पर्वतरांगात होणारी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा
संतोष कोत्रे
लांजा-:
मराठी शाळा, मराठी भाषा आणि पर्यावरण ही संकल्पना घेऊन तालुक्यातील शिपोशी येथील न्या. वै. वि. आठल्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शिपोशी’च्या माजी विद्यार्थी विचार मंचा’च्या वतीने सह्याद्री पर्वतरांगांच्या हिरवीगार कुशीत २०२६ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ‘सह्याद्री मॅरेथॉन या भव्य दिव्य अशा स्पर्धे’चे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगात होणारी ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा ठरणार असून राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉनपटू या स्पर्धेत उतरणार असल्याने ही स्पर्धा लांजा तालुक्याच्या आजवरच्या गौरवशाली परंपरेला नवा आयाम देणारी ठरणार आहे.
लांजा तालुक्याचा विचार केला तर या तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले आहे. साटवली येथील शिवकालीन गढी, झाशीच्या राणीचे सासर माहेर असलेले कोलधे – कोट ही गावे आणि सह्याद्री पर्वताच्या रांगा. याच सह्याद्री पर्वतांच्या निसर्ग संपन्न आणि हिरव्यागार पर्वतरागांच्या कुशीत सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. वै. वि. आठल्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शिपोशी’च्या माजी विद्यार्थी विचार मंचा’च्या वतीने पत्रकार परिषद घेऊन या स्पर्धेची घोषणा करण्यात आलेली आहे.
ही स्पर्धा हि विविध वयोगटातील धावपटूंसाठी ५ किमी, १० किमी आणि २१.०९७५ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा रोमांचक अंतरांची असणार आहे.
मराठी शाळा,भाषा आणि पर्यावरण संकल्पना घेऊन या स्पर्धेच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे. या मॅरेथॉनद्वारे सह्याद्रीच्या सौंदर्यातून प्रेरणा घेऊन स्थानिक तरुणांना व्यायामाची सवय लावली जाईल. स्पर्धेच्या माध्यमातून आरोग्य जागृती, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे. शिपोशीच्या या मॅरेथॉनमुळे युवक युवती मैदानी खेळांकडे आकर्षित होऊन सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील धावण्याची परंपरा कायम राहण्यास मदत होणार आहे.
ही स्पर्धा लांजा तालुक्यातील हौशी धावपटू बरोबरच जिल्हा तसेच राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. कारण सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये, चढउतारावरून होणारी ही पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा असणार आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांना नवा साज चढलेला असतो. येथील वातावरण आल्हाददायक आणि निसर्गरम्य असते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धकांना या स्पर्धेच्या निमित्ताने हा वेगळा अनुभव या निमित्ताने अनुभवास मिळणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रोफेशनल मॅरेथॉन पटूंना देखील कोकणातील या निसर्गसंपन्न वातावरण आणि सौंदर्याचा लाभ मिळणार आहे. त्यातून भविष्यात पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच ही मॅरेथॉन स्पर्धा लांजा तालुक्यासाठी एक नवसंजीवनी ठरेल.
आपण आपल्या उद्योग व्यवसाय वा नोकरीतून जे काही कमावतो त्यापैकी पाच टक्के वाटा हा समाजाच्या उपयोगासाठी आला पाहिजे, याच उदात्त हेतूने शिपोशी येथील न्या. वै. वि. आठल्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शिपोशी’च्या माजी विद्यार्थी विचार मंचाचे पदाधिकारी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत. लांजा तालुक्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून तालुक्याला आणि पर्यायाने येथील जन माणसाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या हेतूने या माजी विद्यार्थी विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकले आहे. ही स्पर्धा होईल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत मॅरेथॉन पटू स्पर्धेत सहभागी होतील आणि त्याद्वारे खऱ्या अर्थाने सह्याद्री पर्वतरांगा, तेथील नैसर्गिक सौंदर्य जगासमोर येण्यास मदत होईल. त्यासाठी लांजावासीयांचा भरभरून प्रतिसाद, लागणारी सर्वतोपरी मदत करणे हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून लांजा तालुक्याचे नाव रोशन होणार आहे.
माहे ऑगस्ट, २०२६ पासून online नोंदणी सुरू होईल. सर्व वयोगट, लिंग आणि पार्श्वभूमीतील धावपटूंना सहभागाचे आमंत्रण असणार आहे. माजी विद्यार्थी विचार मंचा’च्या वतीने दत्तप्रसाद कोलते,दीपक नागवेकर,राजेंद्र दळवी,संजय शिंदे,विकास बाईंग, गणेश बाईंग, राजू घडशी,अरविंद तरळ, मच्छिंद्र घाग,प्रकाश कडू,संगीता सावंत,हनुमंत कदम सुभाष शिगम संगीता पवार अन्य पदाधिकाऱ्यांचे योगदान लाभत असून ही स्पर्धा तालुक्याच्या नावलौकिकासाठी माइलस्टोन करेल यात तीळ मात्र शंका नाही.












