तीन ठिकाणी छापे…
पाच जणांना गुन्हा दाखल..
प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापूर : शहरात प्रेमी युगुलांना अश्लील कृत्यांसाठी ‘प्रायव्हेट केबिन’ उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेंवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजकर तिकटी परिसरातील बिनखांबी गणेश मंदिर रोडवरील एका कॅफेमध्ये पडदे लावून बंदिस्त प्रायव्हेट केबिन तयार करण्यात आले होते. येथे प्रेमी युगुलांना एकांत देऊ त्यांना अश्लील चाळे करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती शहर निर्भया पथकाला मिळाल्यानंतर आज दुपारी सुमारे अडीच वाजता छापा टाकण्यात आला.
याप्रकरणी आकाश दादू कोरवी (वय २८,रा.येवलुज,ता.पन्हाळा) व संकेत राजेंद्र ढाले (वय २९, रा.शिवाजी पेठ, कोल्हापूर) या दोन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई मंगळवार पेठेतील ‘कॅफे ७२’ येथे करण्यात आली. येथेही बंदिस्त कप्प्यांमध्ये ग्राहकांना बसण्याची सोय करून अश्लील कृत्यांना वाव दिला जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी शुभम मधुकर पाटील (वय २६, रा.मंगळवार पेठ) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तर तिसऱ्या कारवाईत देवकर पानंद चौक ते क्रेशर चौक दरम्यान असलेल्या एका बेसमेंटमधील ‘द क्राऊन कॅफेवर’ छापा टाकण्यात आला.हा व्यवसाय कोणत्याही अधिकृत परवानगीशिव सुरू असल्याचे तसेच BNSS १६८ अंतर्गत दिलेल्या नोटिसीचे उल्लंघन केल्याचे आढळले. याप्रकरणी रतन राजाराम पाल (वय ३३.रा.सुभाषनगर) अमरसिंह कामते (राहणार मंगळ पेठ) यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम २२३ व ३(५)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निर्भया पथकाने केली. फिर्यादी म्हणून स्वप्नाली खोत यांनी तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्यांना प्रोस्ताहन देणारे किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिकां विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी पोलिसांनी दिला आहे.













