आईच्या खुनाप्रकरणी मुलाला जन्मठेप!

गैरसमजातून आईची हत्या, विलवडे सावंतवाडीतील घटना, १० हजार दंडही.

सिंधुनगरी : प्रतिनिधी

आपल्या विरोधात गावातील लोकांना काहीतरी सांगत असल्याचा गैरसमज करून घेत आपल्या आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलगा दीपक विष्णू दळवी (४७) रा. विलवडे वरचीवाडी, सावंतवाडी याला जिल्हा व सत्र न्यायाधीश १ श्रीमती व्ही.एस.देशमुख यांनी दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. सरकारपेक्षातर्फे सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

यातील मयत राधाबाई विष्णू दळवी ह्या आरोपी दीपक दळवी यांची आई असून त्या त्याच्या सोबत एकाच घरात राहत होत्या. मात्र आपली आई आपल्या विरोधात गावातील लोकांना काहीतरी सांगते ह्या गैरसमजातून आई राधाबाई यांच्या डोक्यावर आणि छातीवर हाताच्या ठिकाणी मारहाण करून जीवे ठार मारले होते. तसेच आई ला धाप लागली असून त्यात त्या बेशुद्ध होऊन मयत झाल्याची माहिती बांदा पोलीस ठाण्यात दिली होती. हा प्रकार २५ ऑगस्ट २०२२ रोजी घडला होता.

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सीताराम माने (सध्या मयत) यांनी बांदा पोलीस ठाण्यात दीपक यांच्या विरोधात भादवी कलम ३०२, १७७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी दीपक दळवी याला ३०२ अन्वये जन्मठेपेची आणि १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.