देवगड हापूसच्या बागेत रंगला ‘मियाझाकी’चा सस्पेन्स !

▪️एका फळाला मिळतोय ५०० रुपयांचा दर

मसुरे | झुंजार पेडणेकर : हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या देवगडमध्ये सध्या एका वेगळ्याच आंब्याची चर्चा रंगली आहे. येथील एका शेतकऱ्याच्या बागेत चक्क जपानमध्ये आढळणाऱ्या अतिमहागड्या आंब्यासारखा हुबेहूब दिसणारा आंबा फळाला आला आहे. गडद जांभळा आणि लालसर रंग असलेल्या या आंब्यामुळे परिसरात मोठे कुतूहल निर्माण झाले असून, हा नेमका कोणता वाण आहे ? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

▪️आंब्याची ठेवण’ मियाझाकी’ सारखी

देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथील जेष्ठ प्रयोगशील शेतकरी सत्यवान गावकर यांच्या कुणकेश्वर ईळये सीमेवरील बागेतील एका झाडाला हे वैशिष्ट्यपूर्ण आंबे लागले आहेत. या आंब्यांचा रंग, आकार आणि ठेवण ही जपानमधील जगप्रसिद्ध सर्वात महाग (अडीज लाख रुपये किलो ) ‘मियाझाकी’ आंब्याशी मिळतीजुळती आहे. सुरुवातीला हा सामान्य आंबा वाटत होता, मात्र जसजसा तो मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा रंग बदलत जाऊन त्याला गडद लाल छटा आली आहे असे गावकर सांगतात.

▪️तज्ज्ञांच्या मताची प्रतीक्षा

हा आंबा खरोखरच जपानी ‘मियाझाकी’ आहे की अन्य एखादा विदेशी वाण, याची शास्त्रीय खात्री अद्याप झालेली नाही. या फळाची चव, त्यातील साखरेचे प्रमाण (Brix level) आणि झाडाची वैशिष्ट्ये तपासून कृषी तज्ज्ञ लवकरच याबाबत अधिकृत माहिती देऊ शकतील. मात्र, देवगडच्या हवामानात अशा प्रकारच्या फळाचे येणे हा एक यशस्वी प्रयोग मानला जात आहे.सत्यवान गावकर यानी दहावर्षा पूर्वी रत्नागिरी येथून आंबा कलमे खरेदी करून आपल्या बागेत लावली होती. त्यातील एक झाडाला गेल्या वर्षी काही प्रमाणात आकाराने मोठे आंबे लागले होते.

▪️चालू हंगामात 45 आंबे झाडावर

यावर्षी सुमारे 45 आंबे झाडावर आहेत. प्रत्येक आंब्याचे वजन अर्धांकिलो पेक्षा जास्त आहे. हापूसपेक्षा याचा रंग आणि वाढ पूर्णपणे वेगळी आहे. हा नेमका कोणता प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी ते कृषी विभागाशी संपर्क साधत आहेत. या झाडाला कोणतेही रासायनिक खत वापरलेलं नसून शेणखत वापरल्याचे ते सांगतात. या आंब्याचा डार्क लाल रंग आणि त्यावर पांढरे ठिपके आकर्षून घेत आहेत.

गावकर यानी या आंब्याच्या झाडाला जमिनीच्या वर जाळे लावले असून झाडावर पिकून पडलेला आंबा या जाळ्यात अलगद राहतो. हा आंबा झाडावर नैसर्गिक पिकलेला चांगला चवीस लागतो असे त्त्यांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर सुद्धा गावकर यांच्या बागेतील आंबा चांगलाच भाव खात असून फोंडा येथून काही जण 500 रुपये एक आंबा असा दर देऊन आंबा खरेदी करून गेल्याचे गावकर सांगतात. तर पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा फोनद्वारे चौकशी होतं असल्याचे गावकर सांगतात.

▪️आंब्याच्या नावा बाबत संशोधन होणे आवश्यक

दरम्यान या आंब्यांच्या नावा बाबत कृषी तज्ञ सुद्धा निश्चित नसून काहीनि हा आंबा टॉमी ऍट किन्स, लिली, रेड पामर, लालपरी यापैकी सुद्धा असु शकतो असे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. प्रत्यक्ष या आंब्याचे सॅम्पल, झाडाची रचना, फळाचे गुणधर्म याचा शास्त्रीय अभ्यास करूनच हि आंब्याची जात कोणती आहे हे निश्चित होणार असल्याचे फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेचे आंबा फळ तज्ञ डॉ. देवरे यानी सांगितले. कोकणच्या लाल मातीत आता हापूससोबतच अशा परदेशी वाणांचीही यशस्वी लागवड होऊ शकते हे या निमित्ताने समोर आले आहे.

▪️75 वर्षाचे तरुण प्रयोगशील शेतकरी (बॉक्स )

सत्यवान गावकर हे 75 वर्षाचे तरुण शेतकरी आपल्या शेतजमिनीत भात, भुईमूग, कुळीथ, सितारा मिरची अशी पिके सुद्धा घेतात. शासनाच्या कृषी विभागाचे सुद्धा त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. पुणे येथील वनराई फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्यातून त्यांनी चालू हंगामात भुईमूग आणि मिरचीचे पीक घेतले आहे. शेती म्हणजे निव्वळ घाम गाळणं नव्हे, तर ती विज्ञानाची जोड देऊन करण्याची कला आहे, हे देवगडच्या एका वयोवृद्ध शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवलं आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत, मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा शास्त्रोक्त वापर करून त्यांनी पिकवलेली मिरची आज मार्केटमध्ये भाव खाऊन जातेय.वय वर्ष 75, पण जिद्द आजही विशीतल्या तरुणाला लाजवेल अशी! कोकणच्या तांबड्या मातीत केवळ आंबा-काजूच नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मिरची आणि भुईमुगाचं सोनं पिकवणारे देवगडचे एक ‘यंग’ शेतकरी त्यांच्या बागेतील आंब्याच्या वेगळ्या प्रजाती मुळे समाज माध्यमावर ‘व्हायरल ‘ होत आहेत. कृषी विद्यापीठाने सुद्धा त्यांच्या बागेतील या वेगळ्या आंब्यावर संशोधन करून योग्य ती माहिती समाज माध्यमांसमोर आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सत्यवान गावकर यांना 7588568656 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता.