मालवण संघ द्वितीय, तर प्रज्ञासूर्य आसोली संघ तृतीय
वेंगुर्ले : प्रतिनिधी
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बौद्ध पौर्णिमा तसेच महात्मा फुले यांची जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेंगुर्ले येथे आयोजित केलेल्या “रथ समतेचा’ या समूहगायन स्पर्धेत माणगाव येथील प. पू स्वरुपानंद विद्यालयाच्या संघाने सर्वोत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.
कॅम्प येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी शाखा वेंगुर्ले, भारतीय बौद्ध महासभा शाखा वेंगुर्ले, विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन वेंगुर्ले, यसार फाऊंडेशन सिंधुदुर्ग, व्हिजन वेंगुर्ला-मुंबई आदी संस्थांच्या सहआयोजनातून आयोजित केलेल्या या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच मालवण संघाने तर तृतीय क्रमांक वेंगुर्ले-आसोली येथील प्रज्ञासूर्य महिला संघाने प्राप्त केला. स्पर्धेतील उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक सरमळे येथील पंचशील महिला समूहाला देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण तांबोळी-दोडामार्ग येथील नामवंत गायक अमित तांबोळकर यांनी केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष सुहास कोळसुलकर, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे अध्यक्ष तथा फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे सचिव महेंद्र मातोंडकर, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील जाधव, दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापाक किशोर सोन्सुरकर, परीक्षक अमित तांबोळकर, भारतीय बौद्ध महासभेचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर, स्पर्धा प्रमुख लाडू जाधव, यसार फाऊंडेशन सिंधुदुर्गचे सत्यवान तेंडुलकर, आंबेडकर समन्वय समितीचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुनील जाधव, मुंबई येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते जयराम जाधव, फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे उपाध्यक्ष अॅड. नामेदव मठकर, महिला प्रतिनिधी विमल शिंगाडे, सदस्य राजेंद्र शिंगाडे, भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वेंगुर्ले तालुकाध्यक्ष चैत्राली जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. स्पर्धेचे निवेदन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले, तर शेवटी आभार चैत्राली जाधव यांनी मानले.











