रत्नागिरीत ९ मे रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’

वादांवर सामोपचाराने पडदा टाकण्याची संधी

रत्नागिरी:
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार, येत्या ९ मे २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ‘राष्ट्रीय लोकअदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत रत्नागिरीतील जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत पार पडणार आहे.
या लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेले तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाऊन्सची प्रकरणे आणि दिवाणी वादांवर सुनावणी घेतली जाईल. तसेच वाद दाखल होण्यापूर्वीच्या (Pre-litigation) प्रकरणांमध्ये विद्युत कंपनी, बँका, पतसंस्था यांची थकीत कर्जे, नगरपरिषद व ग्रामपंचायतींकडील थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची मामलेदार कोर्टातील प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठेवली जाणार आहेत.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. श्री. व्ही. वाय. जाधव यांनी नागरिकांना या लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पक्षकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवून घ्यावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवायची आहेत, त्यांनी आपल्या वकिलांशी, संबंधित न्यायालयाशी किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्राधिकरणाचे सचिव श्री. आर. आर. पाटील यांनी केले आहे.